no images were found
रखडलेल्या पादचारी उड्डाणपूल बांधणीसाठी जिल्हा नियोजन मधून 73 लाख निधीची तरतूद करून पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्या :
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रेल्वे स्थानकामध्ये पादचारी उड्डाणपूल बांधणे गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. यामुळे राजारामपुरी, शाहूपुरी, प्रतिभा नगर, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कलानगरी या भागातील नागरिक राजारामपुरी भागाकडे येण्या-जाण्यासाठी धोका असणाऱ्या परिख पुलाचा वापर करतात.
याविषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, बऱ्याच वर्षापासून पादचारी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते परंतु दुर्दैवाने आज अखेर या कामाची सुरुवात झालेली नाही. ०७/०३/२०२४ रोजी या कामाची वर्क ऑर्डर सचिन फॅब्रिकेटर, पुणे यांना दिली गेली आहे. या कामाचे एस्टिमेट ३,८८,६९,००० आहे जे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान जिल्हास्तर या योजनेअंतर्गत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेने रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूकडील भाग जोडणे करिता जिल्हा वार्षिक योजना सन २०१७-१८ अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रेल्वे स्थानकानजिक (४७/०५०) मिरज कोल्हापूर विभागा अंतर्गत पादचारी उड्डाण पुल बांधणे कामी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) हाती घ्यावयाच्या पायाभूत सुविधांच्या कामांसाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार मनपा हिश्श्याची ३० टक्के रक्कम रुपये ०.५५ कोटी व शासन अनुदान ७० टक्के रु.१.३० कोटी अशी तरतुद करणेत येऊन सदर आकृतीबंधानुसार रक्कम रु.१.८५ कोटीचे काम हाती घेणेत आले होते. सदर कामाचे डिझाईन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांचेकडे तपासणीसाठी सादर करणेत आले होते. सदर डिझाईनला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांची मंजूरी झालेली आहे. सदर डिझाईन अंतिम मंजूरीसाठी रेल्वेविभागाकडे पाठविले होते.
कोल्हापूर महानगरपालिकेने रेल्वे विभागाच्या मागणीनुसार दिनांक २४/१२/२०२४ रोजी रु. ५२,०९,४८१/- इतकी रक्कम पी अँड आय शुल्क, डी अँड जी शुल्क, देखभाल शुल्क, वे-लीव्ह शुल्क तसेच 2 गँगमन शुल्क किंवा संरक्षण शुल्क यासाठी Sr. Divisional Finance Manager, Central Railway, Pune यांचेकडे डिमांड ड्राफ्ट ९४६२३२ द्वारे भरणेत आले आहेत. दरम्यानच्या काळात कोल्हापूर-मिरज लाईनचे विद्युतीकरण रेल्वे विभागाकडून जागेवर करणेत आलेले आहे. या विद्युतीकरणाच्या लाईनचे काही खांब प्रस्तावित असलेल्या प्रस्तावित पादचारी उड्डाणपूलाच्या ठिकाणी येत आहेत. सदर बाब रेल्वे विभागास विद्युतीकरणाची लाईनचे काम चालू असताना निदर्शनास आणून दिली होती. तेव्हा रेल्वे विभागाने सदरचे खांब स्थलांतरित करण्यात येतीत असे सांगण्यात आले. सद्यस्थितीत सदरचे खांब स्थलांतरित केलेशिवाय प्रस्तावित पादचारी उड्डाण पूलाचे काम करणे शक्य होणार नाही.
सदर विद्युतीकरणाच्या लाईनचे खांब स्थलांतरित करणेकरिता रेल्वे विभागाकडे पत्रव्यवहार केला असता त्यांनी दि.२१/०१/२०२५ रोजीने विद्युतीकरणाच्या लाईनचे खांब स्थलांतरित करणेचा अंदाजपत्रकीय खर्च रु.१,१३,१६,३१२.२२/- इतका खर्च कळविला होता. त्यानंतर दि. ०६/०१/२०२६ रोजीच्या पत्रान्वये पुनरावलोकन करून रु. ७३,३८,५९७.४४/- इतका कळविला आहे. सदरची रक्कम महानगरपालिकेने रेल्वे विभागाकडे भरणे आवश्यक असलेबाबत कळविले आहे. रेल्वे विभागाने कळविलेला विद्युतीकरणाच्या लाईनचे खांबस्थलांतरित करणेचा खर्च हा जास्त असल्याचे दिसत आहे असे आणि विद्युतीकरणाच्या लाईनचे खांब स्थलांतरित करणेचे काम टाळणेसाठी प्रस्तावित पादचारी उड्डाणपूल नियोजित जागेपेक्षा काही अंतरावर मिरज बाजूला बांधण्याची परवानगी देण्यात यावी व तसे मंजूरी मिळणेस दि. २८/१०/२०२५ रोजी म.न.पा.ने पत्राद्वारे रेल्वे विभागास कळविले होते.
सध्याची महानगरपालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता ही रक्कम महापालिका भरू शकत नाही. तरी, सदर विद्युतीकरणाच्या लाईनचे खांब स्थलांतरित करणेकरिता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही रक्कम देऊन कोल्हापूर रेल्वे स्थानकामध्ये पादचारी उड्डाणपूल बांधून नागरिकांना दिलासा द्यावा असे निवेदन सादर केले.
या निवेदनाला उत्तर देताना निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव म्हणाले याबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सादर करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, हेमंत आराध्ये, अप्पा लाड, प्रदीप उलपे, मंगला निपाणीकर, अनिल कामत, दीपक काटकर, सयाजी आळेकर, गणेश देसाई, सुनील पाटील, भूषण कानकेकर, सचिन कुलकर्णी, रवींद्र मुतगी दिग्विजय कालेकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.