no images were found
अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार?
अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध चालू आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसेच शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध चालू आहे. “शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी उमेदवार असून पुढच्या निवडणुकीत आमचा उमेदवार आम्ही निवडून आणू,” असं वक्तव्य करत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिलं आहे. अजित पवारांचं आव्हान स्वीकारत अमोल कोल्हे म्हणाले, “१०० टक्के मी निवडणूक लढवणार. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल.” तसेच अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्वीकारलं आहे.
अजित पवार विरुद्ध अमोल कोल्हे असा सामना चालू असताना अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यात उडी घेतली आहे. अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी अकोला येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अजित पवारांनीच अमोल कोल्हे यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. त्यांना पूर्ण पाठबळ देऊन निवडून आणलं. त्यामुळे आतादेखील अजित पवार ज्याला उमेदवारी देतील तोच उमेदवार शिरूरची लोकसभा निवडणूक जिंकणार. अजित पवार यांनी आव्हान दिलं आहे म्हटल्यावर ते आमचा उमेदवार निवडून आणणारच. याआधी त्यांनी विजय शिवतारेंना पराभूत करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यांनी ते करून दाखवलं. त्यानंतर अजित पवार म्हणाले, मी अमोल मिटकरीला आमदार करेन, त्यांनी मला आमदार केलं. अजित पवार शब्दाचे पक्के आहेत. त्यामुळे भविष्यात शिरुरचा गड अजित पवारांकडेच असेल.
दरम्यान, अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचं आव्हान स्वीकारलं आहे. यावर अमोल मिटकरी म्हणाले, कुस्तीच्या फडात उतरल्यावर आव्हान स्वीकारलंच पाहिजे. शेवटी विजय हा तगड्या पैलवानाचा होतो. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवार मोठे नेते आहेत आणि अमोल कोल्हे सामान्य कार्यकर्ते आहेत.
दरम्यान, अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार का? यावरही अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत मिटकरी म्हणाले, अजित पवारांच्या पाठिंब्यामुळेच अमोल कोल्हे लोकसभा निवडणुकीत जिंकले होते. भाजपाबरोबर जाण्यासाठी पक्षातील पदाधिकारी-आमदार खासदारांनी अजित पवार यांना शपथपत्रं दिली होती. अमोल कोल्हे यांचंही शपथपत्र अजित पवार यांच्याकडे आहे. मी स्वतः ते शपथपत्र वाचलं आहे. मी पक्षाचा प्रतोद असल्यामुळे सर्व शपथपत्रं पाहिली आहेत.