no images were found
जागतिक तंबाखू विरोधी दिन – विशेष लेख
तंबाखूला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार
आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र झपाट्याने प्रगती करत असताना दुसऱ्या बाजूला तंबाखूचे वाढते व्यसन समाजासमोर गंभीर आरोग्य संकट निर्माण करत आहे. गुटखा, पानमसाला, खर्रा, सिगारेट, बीडी तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन युवकांपासून प्रौढांपर्यंत चिंताजनक गतीने वाढताना दिसत आहे. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ३१ मे हा दिवस ‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ‘खोट्या आकर्षणाचा पर्दाफाश – निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाला चोख प्रत्युत्तर’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित केवळ जनजागृती न करता, समाजामध्ये तंबाखूविरोधी एक व्यापक जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तंबाखू हे केवळ क्षणिक आनंदाचे व्यसन नसून ते तोंडाचा, घशाचा व फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या अनेक जीवघेण्या आजारांचे मूळ कारण ठरत आहे.
या गंभीर आव्हानाचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गेल्या वर्षभरात जनजागृती, समुपदेशन, व्यसनमुक्ती सेवा आणि कायद्याची अंमलबजावणी या चहुबाजूने प्रभावी कामगिरी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७ तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्रातून एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत ५,७६३ रुग्णांची नोंदणी करण्यात आली, ज्यापैकी ९८४ नागरिकांनी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन पूर्णपणे सोडण्यात यश मिळवले आहे. ही आकडेवारी व्यसनमुक्तीच्या दिशेने पडणारे एक आशादायक पाऊल मानली जात असली, तरी दुसरीकडे राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत ७१३ संशयित रुग्णांपैकी ४२ जणांमध्ये कर्करोगाचे झालेले निदान समाजासाठी एक गंभीर धोक्याची घंटा वाजवणारे ठरले आहे.
तरुणाईला या जीवघेण्या विळख्यातून सुरक्षित ठेवण्यासाठी शैक्षणिक आणि आरोग्य संस्थांमध्ये विशेष उपक्रम राबवून जिल्ह्यात ११७ तंबाखूमुक्त शाळा आणि ५३६ तंबाखूमुक्त आरोग्य संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. शाळा परिसरात तंबाखू विक्रीला प्रतिबंध करण्यासोबतच विविध व्याख्याने, सामूहिक शपथ आणि पोस्टर मोहिमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडत आहेत. केवळ प्रबोधनावर न थांबता, कोटपा (COTPA 2003) कायद्यांतर्गत पोलीस, आरोग्य आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे मोठी मोहीम उघडली आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ५६१ लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, यामध्ये आरोग्य विभागाने ४,६७,००० रुपये, पोलीस विभागाने १,९२,००० रुपये आणि अन्न व औषध प्रशासनाने ३४,००० रुपयांची दंडवसुली करत कायद्याचा कडक बडगा उगारला आहे.
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीमुळे त्याच्या आसपास वावरणाऱ्या लहान मुलांच्या, महिलांच्या आणि वृद्धांच्या आरोग्याला निर्माण होणारा ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चा धोका लक्षात घेता हा लढा आता केवळ प्रशासकीय न राहता समाजाची सामूहिक जबाबदारी बनला आहे. पालक, शिक्षक, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन तरुणांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज आहे. तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी १८००-११-२३५६ हा मोफत समुपदेशन टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असून नागरिकांनी याचा लाभ घेणे आवश्यक आहे. ‘तंबाखूला नकार आणि निरोगी जीवनाचा स्वीकार’ करत सशक्त राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक कोल्हापूरकराने या व्यसनमुक्तीच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणे हेच या जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे खरे उद्दिष्ट ठरेल. जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंबाखू विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आरोग्य, पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत संयुक्त मोहिमा राबविण्यात येत आहेत. – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष, कोल्हापूर.