no images were found
कोणतेही पिंपळाचं झाड तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी, हा उपक्रम आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे – आमदार सुहास बाबर
- एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरु होऊन सांगली जिल्ह्यात हरित क्रांतीला प्रचंड प्रतिसाद…
- एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ पर्यावरणात सकारात्मक बदल घडवू पाहत आहे – आमदार सुहास बाबर
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात एका आगळ्यावेगळ्या प्रकारच्या लष्करी शिस्तीचा हरित उठाव सुरु आहे अवघ्या सांगली जिल्ह्यात या अनोख्या उपक्रमाचा गवगवा पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील तरुण आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून या हरित क्रांतीचं नेतृत्त्व पाहायला मिळत आहे. आडनिड्या ठिकाणी वाढलेलं पिंपळाचं झाड, तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी म्हणून सुरु झालेला प्रवास आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे असं आमदार सुहास बाबर यांनी सांगितलं.
दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर हे मातीशी घट्ट नाळ जोडलेले पश्चिम महाराष्ट्रातील नेते होते. सांगली ग्रामीण भागातील टेंभू योजनेचे जनक असा त्यांचा सार्थ उल्लेख केला जातो. त्यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा मिळालेल्या सुहास बाबर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ७८१७८ इतके मताधिक्य घेतले तेव्हाच त्यांनी ठरवले की आमदारकीच्या काळात मताधिक्या एवढे वृक्ष मतदारसंघात लावावेत. याबाबत बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून आज मोठी हरित लोक चळवळ खानापूर आटपाडी परिसराच्या पर्यावरणात सकारात्मक बदल घडवू पाहत आहे.
समाज माध्यमांवर पिंपळाची गोष्ट प्रसारित केल्यानंतर त्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादातून हजारो लोकं जोडली गेली आणि दररोज जोडली जात आहेत. लोकं स्वयंप्रेरणेने जागा, पाणी, झाडं, श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. ट्री आर्मी असं नामकरण लोकांनीच केलं असल्याचं आमदार बाबर म्हणाले. आपल्या मातोश्रींच्या श्राद्ध दिवशी ५३०० आंब्याची कलमे रुजवल्याची माहिती त्यांनी दिली. तर विटा नागरपालिकेच्या नगरसेवकाने या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून चार वर्षांची वाढलेली 52 झाडं भेट दिली तसेच आळसंद ग्रामपंचायतीने 500 झाडांचे रोपण केले आहे असे ते म्हणाले.
सांगलीचे जिल्हा प्रशासन, वन विभाग यांच्या माध्यमातून एक एकर जागेत जपानी पद्धतीचा मियावकी जंगल विकसित करण्याचे निश्चित केल्याची माहिती त्यांनी दिली. गायरान जमिनीवर, रस्त्यालगत महाराष्ट्राच्या मातीत नैसर्गिकपणे उगवणारी झाडे रुजवण्याचा उपक्रम मतदारसंघात आता सुरु आहे. पूर्वी जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर “ग्रीन टनेल” वाहनचालकांना विशेषतः दुचाकीस्वारांना सावली आणि थंडावा देत पण महामार्ग आणि रस्ता रुंदीकरणामुळे हे ग्रीन टनेल नाहीसे झाले, त्याला पूर्ववत करण्याचे ध्येय ठेवल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले.
येत्या ५ जून रोजी होणाऱ्या वसुंधरा दिनानिमित्त अधिक प्रमाणात वड, पिंपळ, बहावा, करंज, चिंच अशा डेरेदार वृक्षांची लागवड सुरु आहे, त्यांच्या संगोपन आणि संवर्धनासाठी ट्री आर्मी कटिबद्ध असून जिल्ह्यातील विविध व्यक्ती, व्यापारी संघटना, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. नोकरी धंद्यानिमित्त खानापूर आटपाडीपासून दूर राहणाऱ्या लोकांना पुन्हा एकदा आपल्या गावाशी नाळ जुळवायची असेल तर सहभागी व्हावे असे आवाहनही आमदार सुहास बाबर यांनी केले.