no images were found
अदाणी–डायऑक्सीकल भागीदारी द्वारे कमी-कार्बन रासायनिक उत्पादनाला चालना
अहमदाबाद आणि पॅरिस, : अदाणी समूहाची प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) आणि रासायनिक उत्पादन क्षेत्रात विशेष प्राविण्य असलेली फ्रेंच स्वच्छ-तंत्रज्ञान कंपनी डायऑक्सीकल यांनी आज भारतात कमी-कार्बन रासायनिक उत्पादन विकसित करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी दीर्घकालीन भागीदारीची घोषणा केली.
या उपक्रमाची सुरुवात अदाणी समूहाच्या एका प्रकल्पस्थळी प्रायोगिक (पायलट) सुविधेपासून होणार असून, या सुविधेमध्ये पकडलेल्या कार्बन डायऑक्साइड आणि नवीकरणीय विजेचा वापर करून फॉर्मिक अॅसिडचे उत्पादन केले जाईल. यशस्वी पडताळणीनंतर, दोन्ही भागीदार या तंत्रज्ञानाचा व्यावसायिक उत्पादनासाठी विस्तार करण्याची योजना आखत आहेत.
फॉर्मिक अॅसिड आणि त्याची व्युत्पन्न उत्पादने वस्त्रोद्योग, कृषी आणि उत्पादन उद्योगासह विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. या प्रकल्पाचा उद्देश पकडलेल्या कार्बन उत्सर्जनाचे स्वच्छ ऊर्जेच्या सहाय्याने मूल्यवर्धित उत्पादनांमध्ये रूपांतर कसे करता येते, हे दाखवून देणे हा आहे.
या भागीदारीमध्ये डायऑक्सीकलचे विद्युत-आधारित रासायनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि अदाणी समूहाची स्वच्छ ऊर्जा क्षमता, पायाभूत सुविधा तसेच प्रकल्प अंमलबजावणीतील कौशल्य यांचा संगम घडवून शाश्वत आणि खर्चाच्या दृष्टीने स्पर्धात्मक रासायनिक उत्पादनाचे नवे मॉडेल विकसित केले जाणार आहे.
“पूर्णपणे नवीकरणीय विजेवर आणि पकडलेल्या कार्बनवर आधारित भारतातील पहिली फॉर्मिक अॅसिड उत्पादन सुविधा उभारण्याचा आम्हाला अभिमान आहे. डायऑक्सीकलसोबतची ही भागीदारी धोरणात्मक औद्योगिक समन्वयाच्या माध्यमातून कार्बनसारख्या दायित्वाचे शाश्वत, किफायतशीर आर्थिक मालमत्तेत रूपांतर कसे करता येते, याचा उत्कृष्ट नमुना आहे,” असे श्री. जीत अदाणी, संचालक, अदाणी समूह यांनी सांगितले.
“ही भागीदारी स्वच्छ तंत्रज्ञान आणि औद्योगिक स्तरावरील क्षमतांचा संगम साधून अत्यावश्यक रसायनांचे उत्पादन कसे बदलू शकते, हे दर्शवते. भारताकडे नवीकरणीय ऊर्जा, उत्पादन क्षमता आणि महत्त्वाकांक्षा यांचा अद्वितीय संगम आहे. अदाणी समूहासोबत मिळून आम्ही कमी-कार्बन रासायनिक उत्पादनासाठी स्पर्धात्मक आणि विस्तारक्षम मॉडेल उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,” असे डॉ. सारा लामेझॉन, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि सह-संस्थापक, डायऑक्सीकल यांनी सांगितले.
फॉर्मिक अॅसिडच्या पलीकडे जाऊन, दोन्ही भागीदार ऊर्जा, साहित्य, पॅकेजिंग आणि उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध रसायनांच्या व्यापक पोर्टफोलिओच्या विकासाच्या संधींचाही शोध घेणार आहेत. यापैकी अनेक क्षेत्रे आजही जीवाश्म इंधनावर आधारित कच्च्या मालावर अवलंबून असून, उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांच्यावर वाढता दबाव आहे.
अदाणी समूहासाठी हा उपक्रम रसायन उद्योगातील धोरणात्मक प्रवेश दर्शवतो. नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमधील आपल्या बळकटीच्या आधारावर भविष्यासाठी सज्ज व्यवसायांच्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.
ही भागीदारी स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातील भारत–युरोप सहकार्यालाही अधिक बळकट करते. जागतिक पुरवठा साखळी अधिक शाश्वत पर्यायांचा शोध घेत असताना, मोठ्या प्रमाणावरील उत्पादन क्षमता, औद्योगिक कौशल्य आणि मुबलक नवीकरणीय ऊर्जा संसाधनांच्या बळावर भारत प्रगत उत्पादनासाठी पसंतीचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.
हा उपक्रम “मेक इन इंडिया” आणि “विकसित भारत 2047” या दुहेरी राष्ट्रीय उद्दिष्टांना पाठबळ देतो. तंत्रज्ञानाधारित विकासाला चालना देणे, देशांतर्गत उत्पादन क्षमतांना बळकटी देणे आणि भारताच्या अधिक स्पर्धात्मक तसेच शाश्वत अर्थव्यवस्थेकडे होणाऱ्या संक्रमणाला गती देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.