
no images were found
…आणि श्रद्धाच्या खूनप्रकरणी आफताबला बेड्या ठोकल्या
नवी दिल्ली : आफताब पूनावालाने मे महिन्यात त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून विल्हेवाट लावली. आफताबला श्रद्धाच्या हत्येनंतर चार महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं, तो श्रद्धाला शोधण्यात पूर्ण मदत करणार असं सांगून आपल्यावरचा संशय टाळण्यास यशस्वी झाला होता. पण वसई पोलिसांच्या एका युक्तीमुळे तोच आरोपी असल्याचं शोधण्यास मदत झाली.
श्रद्धाचे वडील विकास यांनी त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती, आफताबला ६ ऑक्टोबरनंतर चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण आफताब पोलिसांची दिशाभूल करण्याच्या तयारीनेच चौकशीसाठी आला होता. त्यामुळे तो २६ वर्षीय श्रद्धा वालकरसोबतच्या त्याच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल पोलिसांसमोर खूप आत्मविश्वासाने स्पष्टपणे बोलत होता.श्रद्धा भांडणानंतर दिल्लीतील घर सोडून निघून गेली होती. परंतु, मी तिच्याशी पॅच-अप करण्याचा किंवा तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही, ही माझी चूक होती. चौकशीनंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा आफताब खूप कॉन्फिडन्ट वाटला. या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा त्याला दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी बोलावण्यात आलं तेव्हा त्याने काही परस्परविरोधी विधानं केली. त्याच्या बदललेल्या जबानीवरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी आफताबवर पाळत ठेवली. आफताबला वाटलं की नियमित चौकशी संपली आहे आणि पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलं नाही. पण पोलिसांचं मात्र त्याच्यावर लक्ष होतं. यावेळी चौकशी संपल्यानंतर आफताबने वसईतील एका बारला भेट दिली. या ठिकाणी त्याला श्रद्धाच्या हत्येबद्दल विचारलं आणि त्याने दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणाचे रहस्य उलघडले .
आफताबने 3 नोव्हेंबर रोजी पोलिसांची भेट घेतल्यानंतर एका दिवसाने मुंबई सोडली, तेव्हा पोलिसांनी दिल्ली पोलिसांना त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगत सावध केलं होतं. १० नोव्हेंबर रोजी पोलीस आफताबच्या घरी पोहोचले आणि चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं. जिथे आफताबने श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचा दावा केला होता, त्याच जंगलातून आतापर्यंत पोलिसांना १३ हाडे सापडली आहेत. मात्र तिचं डोकं, कवटी अद्याप सापडलेली नाही. श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिचं बँक अकाउंट अॅप ऑपरेट केले आणि ५४,००० रुपये आपल्या खात्यात ट्रान्सफर केले. आफताबने मोठ्या प्रमाणात पाणी वापरल्याचं त्याच्या फ्लॅटच्या ३०० रुपयांच्या प्रलंबित पाण्याच्या बिलावरून सिद्ध झालं. आफताबने कदाचित रक्ताचे डाग पुसण्यासाठी आणि खुनाचे इतर पुरावे नष्ट करण्यासाठी हे पाणी वापरलं असावं. असा पोलिसांचा संशय आहे.