no images were found
सीएसआरद्वारे सहभागी संस्थांची ठिकाणे अंतीम लवकरच कामाला सुरुवात
कोल्हापूर, : शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सीएसआर च्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यासाठी आज महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली चौथी बैठक पार पडली. महानगरपालिकेच्या छत्रपती शाहू सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. महापौरांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘माझं शहर, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत शहरातील प्रमुख चौक, आयलंड, दुभाजक, फुटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महापालिकेच्या शाळा तसेच उद्यानांचे सुशोभिकरण सीएसआरच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या उपक्रमास विविध सामाजिक संस्था व उद्योग समूहांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक संस्थांनी आपापल्या जबाबदारीच्या ठिकाणांचे सुशोभिकरण आराखडे यावेळी सादर केले.
प्रारंभी सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी 35 संस्थांपैकी 30 संस्थांना मागणीप्रमाणे ठिकाणांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिली. उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांनी या उपक्रमासाठी गठीत समितीची माहिती देत महापालिकेची नियमावली वाचून दाखवली.
महापौर रुपाराणी निकम यांनी बोलताना, शहर सुशोभिकरणाचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद आहे. विविध संस्थांच्या सहभागामुळे कोल्हापूर शहराच्या सौंदर्यात निश्चितच भर पडेल. स्वच्छ व सुंदर कोल्हापूर घडविण्यासाठी महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले. तसेच सादर करण्यात आलेल्या आराखड्यांची शहर अभियंत्यांनी तात्काळ तपासणी करून दोन दिवसांत अंतिम मान्यता देण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक विभागानेही चार ते पाच दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले.
आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी संस्थांना आवश्यक असल्यास अतिरिक्त ठिकाणांची मागणी करण्याचे आवाहन केले. उपलब्धतेनुसार जागा देण्यात येतील तसेच सर्व परवानग्या महापालिकेच्या धोरणानुसार दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक शाखेने जागेवर तपासणी करुन तत्काळ एनओसी देऊन कामांना गती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
गटनेते आदिल फरास यांनी एनओसी प्रक्रियेसाठी स्वतंत्र दोन दिवसांचा विशेष कॅम्प आयोजित करण्याची सूचना केली. कोल्हापूर फर्स्टचे सुरेद्र जैन यांनी महापालिकेने इतक्या तात्काळ शहर सुशोभिकरणासाठी गतीने काम केले. महापौर व आयुक्तांमुळे ही गती मिळाल्याचे सांगितले. ही सुरवात आहे आता शहरामध्ये चांगल्या गोष्टी घडतील. चौक व आयलॅन्ड गतीने सुशोभिकरण होऊन शहराचा चेहरा बदलेल.
यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, विजयसिंह देसाई, नगरसेविका सौ.माधुरी व्हटकर, सौ.रेखा उगवे, सौ.अर्चना कोराणे, सौ.माधूरी नकाते, सौ.सृष्टी जाधव, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, ट्राफिक शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.एस.मात्रे, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा सौ.पल्लवी कुलकर्णी, इन्नर क्लबचे श्रेयस भारते, आर.जे.ग्रुपचे किरण जाधव, महाराष्ट्र इंजिनिअर्सचे नितीन वाडीकर, भारतीय जनसंवर्धन मंचचे पासर ओसवाल, केपीआरटी एन्टरप्राईझेसचे पियुष शहा, डॉ.नरेंद्र बसरगे, रमाई एन्टरप्राईझेसचे अदिती टोपकर व इतर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.