no images were found
मोबाईलवरील रेकॉर्डिंगमुळे फुटली वडिलांच्या खुनाला वाचा
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये पतीच्या मृत्यूच्या तीन महिन्यानंतर तो मृत्यू नैसर्गिक नसून खून असल्याचे उघडकीस आलं आहे. इतकंच नाहीतर पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने खून केला. दोघांमध्ये झालेल्या फोनवरील संभाषणामुळे हा रहस्यमय प्रकार उघडकीस आला आहे.
वडिलांची हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मुलींना मिळाली. त्यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. अंतिम संस्कार आटोपून मुली परत गेल्या. मात्र, मोबाईलवरील आईचं रेकॉर्डिंग झालेलं संभाषण ऐकून मुली हादरल्या. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि आईविरोधात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली. तीन महिन्यानंतर हत्येचे कारण समोर आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रंजना श्याम रामटेके (५०), मुकेश राजबहादूर त्रिवेदी (४८) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपूरी शहरातील आंबेडकर चौकात आरोपी रंजना रामटेके यांचे जनरल स्टोअर्सच दुकान आहे. शेजारीच मुकेश त्रिवेदी याच भाजीपाला व बांगडीचे दुकान आहे. त्यामुळे त्रिवेदी याचे रंजनाच्या घरी नेहमी येणे-जाणे सुरू होते.
फिर्यादी मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार. ६ ऑगस्ट २०२२ ला सकाळी तिच्या आईन हृदयविकाराच्या धक्क्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती फोनद्वारे दिली. दोन्ही मुलींसाठी हा मोठा धक्का ठरला. वडील वनविभागात क्लार्क पदावरून निवृत्त झाले होते. ते ६६ वयाचे होते. हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सत्य मानून त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बहिणी परत नागपूरला गेल्या. घटनेच्या काही महिन्याआधी लहान मुलीने तिचा मोबाइल आईला दिला होता. त्यात ती आपलं सिम टाकून वापरत होती. मोबाईल हाताळत असताना वडील मरण पावल्यानंतर आईच्या मोबाइलमधील त्रिवेदी यांच्यासोबत ६ ऑगस्ट २२ रोजी पहाटे २.१४ वाजता तब्बल १०.५७ मिनिटे बोलल्याची त्यात रेकॉर्डिंग आढळली. मुलीने ही रेकॉर्डिंग आपल्या मोबाइलमध्ये ट्रान्स्फर केली. त्यात वडिलांचे हात बांधले, विषारी द्रव्य पाजले आणि उशीने तोंड दाबले असा उल्लेख आहे.
त्रिवेदी याने अंथरूण नीट करून सकाळी सर्वांना पती गेल्याचं सांग, असा सल्ला दिल्याचही त्या संभाषणात आढळलं. यावरून मोठ्या मुलीन पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता पती शाम रामटेके यांचा हत्या केल्याचं सत्य बाहेर आलं. पोलिसांनी रंजना रामटेके व तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.