Home मनोरंजन ‘राजा शिवाजी’मधून अभिषेक बच्चनचा दमदार मराठी डेब्यू; संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार

‘राजा शिवाजी’मधून अभिषेक बच्चनचा दमदार मराठी डेब्यू; संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार

1 second read
0
0
25

no images were found

‘राजा शिवाजी’मधून अभिषेक बच्चनचा दमदार मराठी डेब्यू; संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार

कोल्हापूर- जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे. रितेश विलासराव देशमुख आणि अभिषेक बच्चन या दोन अष्टपैलू आणि दमदार कलाकारांना एकत्र आणणारा हा प्रकल्प केवळ भव्यतेसाठीच नाही, तर त्यामागील भावनिक आणि ऐतिहासिक आशयासाठीही विशेष ठरत आहे. अभिषेक बच्चनसाठी ‘राजा शिवाजी’ हा त्यांच्या कारकिर्दीतील पहिलाच मराठी चित्रपट असून, हा त्यांच्या सिनेमाच्या प्रवासातील एक धाडसी आणि महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी पण तुलनेने कमी चर्चेत राहिलेले ज्येष्ठ बंधू संभाजी शहाजी राजे भोसले यांची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय नव्या पिढीसमोर भव्य स्वरूपात साकारला जाणार आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’च्या दमदार ‘फर्स्ट लूक टीझर’मध्ये अभिषेक बच्चन एका पूर्णपणे वेगळ्या आणि प्रभावी अवतारात दिसून येतात. योद्ध्याचा साज चढवलेला पेहराव, रणांगणावरची त्यांची दमदार उपस्थिती आणि बंधुप्रेमाची झलक दाखवणारा भावनिक आविष्कार यामुळे हा टीझर प्रेक्षकांना अक्षरशः भारावून टाकतो. या झलकमधून हा चित्रपट केवळ युद्धांवर आधारित नसून, भावना, नातेसंबंध आणि इतिहासाचा भव्य पट मांडणारा सिनेअनुभव ठरणार आहे, याची स्पष्ट चाहूल लागते.
आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेक बच्चन म्हणाले, “हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे आणि याचा भाग होणे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रितेश विलासराव देशमुख यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून आहे. मी रितेशला जवळपास २५ वर्षांपासून ओळखतो. लातूरमध्ये माझ्या ‘जमीन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमची पहिली भेट झाली. त्या वेळी मी अजय देवगण यांच्यासोबत शूटिंग करत होतो आणि रितेश आम्हाला भेटायला आला होता. तिथूनच आमच्या मैत्रीची सुरुवात झाली आणि पुढे आम्ही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, एकदा रितेश विलासराव देशमुख यांच्या घरी भेट दिली असता त्यांनी अभिनयाच्या पलीकडे जाऊन दिग्दर्शन करण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट साकारण्याचे आपले स्वप्न त्यांच्या समोर मांडले होते. “हे असे स्वप्न आहे जे त्यांनी अनेक वर्षे जपले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली,” असेही त्यांनी नमूद केले.
‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर ३१ मार्च रोजी डिजिटल माध्यमांवर प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भव्य दृश्यरचना, ॲक्शनने भरलेले प्रसंग, ऐतिहासिक वातावरण आणि तीव्रता यामुळे हा टीझर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकांनी या झलकचे वर्णन “अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव”, “भव्य दृश्यसोहळा” आणि “परिपूर्ण सिनेमा” असे करत भरभरून कौतुक केले आहे.
अभिषेक बच्चन यांनी रितेश विलासराव देशमुख यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक करत म्हटले की, “रितेशने कदाचित आजवरचा सर्वात महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपट साकारला आहे. एक दिग्दर्शक म्हणून त्याची क्षमता किती आहे, याबद्दल मला कोणतीही शंका नाही. तो असे काहीतरी निर्माण करणार आहे, जे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरेल. या प्रकल्पाचा भाग होता आल्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे आणि मला वाटते की हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण ठरेल,” असे त्यांनी संगीतले
सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचे दमदार संगीत आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांचे अप्रतिम छायांकन या चित्रपटाला वेगळीच उंची प्रदान करत आहे. प्रत्येक फ्रेममध्ये भव्यता आणि ऐतिहासिक वास्तवतेची झलक जाणवते.
या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख आणि स्वतः रितेश विलासराव देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे, ज्यामुळे या चित्रपटाचा आवाका अधिकच भव्य झाला आहे.
‘जिओ स्टुडिओज’द्वारे सादर करण्यात आलेला आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली ज्योती देशपांडे व जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय इतिहासाचा गौरवशाली वारसा नव्या पिढीसमोर भव्यतेने आणि भावनिकतेने उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय सिनेअनुभव ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…