
no images were found
“होय आम्ही स्वयंभूच! शेंदूर फासलेले दगड नाही” संजय राऊत यांचीही खोचक टीका
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एका मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. दोघेही स्वयंभू आहेत. त्यामुळे मी त्यांना काहीच सल्ला देऊ शकत नाही, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. होय आम्ही स्वयंभूच आहोत शेंदूर फासलेले दगड नाही असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. राज ठाकरेंना एका मुलाखतीत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंबाबत मी काय बोलणार? असं वक्तव्य केलं होतं. त्याबाबत संजय राऊत यांना विचारला असता शेंदूर फासलेल्या दगडांना कुणी नमस्कार करत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
“स्वयंभू दैवतं असतात त्यांच्या मागेच जनता जाते. शेंदूर फासलेल्या दगडांच्या मागे जात नाही. कुणी दगडांना शेंदूर फासतात आणि आता यांना नमस्कार करा असं सांगतात त्यांना लोकं वाकून नमस्कार करत नाहीत. जे स्वयंभू असतात त्या नेत्यांना आणि दैवतांनाच श्रद्धेचा मान मिळतो. तो ठाकरेंना मिळतो. यामुळे जर कुणाला पोटदुखी होत असेल तर त्यांनी सांगावं आमच्याकडे उपचार आहेत.” असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.