no images were found
सैन्य भरती प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी काटेकोर नियोजन करा-जिल्हाधिकारी राहुल रेखावार
उमेदवारांना आवश्यक त्या सोयीसुविधा द्या
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान होणारा अग्निवीर सैन्य भरती मेळावा सुरळीत पार पडण्यासाठी काटेकोर नियोजन करा, अशा सूचना करुन मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.
अग्निवीर सैन्य भरती मेळावा नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांसोबत आढावा बैठक झाली. यावेळी ऊपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भगवान कांबळे, सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल विक्रमादित्य सिंह पाल तसेच सैन्य भरती सहायक अधिकारी,अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, अग्निपथ सैन्य भरती मेळाव्यात कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातून तसेच गोवा राज्यातूनही उमेदवार उपस्थित राहतील. या उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी मेळाव्याच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पुरेसा विद्युत पुरवठा, ये-जा करण्यासाठी वाहतूकीची सोय, तात्पुरती स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा उपलब्ध करुन द्या. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने चहा, नाष्टा, भोजनाची सोय होण्यासाठी प्रयत्न करावा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवा. दिशादर्शक फलक लावून घ्या. एकाच वेळी गर्दी होवू नये याचे नियोजन करा. वाहनतळाची सोय करा, असेही त्यांनी सांगितले.
संचालक कर्नल विक्रमादित्य सिंह पाल म्हणाले, अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती मेळाव्यामध्ये कोल्हापूरसह आसपासचे जिल्हे व गोवा राज्यातील सुमारे 58 हजार उमेदवारांची टप्प्याटप्प्याने जिल्हानिहाय वेळापत्रकानुसार भरती प्रक्रिया पार पडेल. यासाठी सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती त्यांनी दिली.
सैन्य भरती मेळाव्यासाठी मैदान व्यवस्था, विद्युत व्यवस्था, उमेदवारांची भोजन व राहण्याची व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, वाहन व्यवस्था, वाहनतळाची सोय, पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळ उपलब्धता आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.