no images were found
पुणे मार्केट यार्डात गोळीबार करून भरदिवसा दरोडेखोरांनी २८ लाख लुटले
पुणे : मार्केट यार्ड येथील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करुन तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.
दरम्यान, दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात घबराट निर्माण झाली होती. मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दरोडेखोर कार्यालयात शिरले. दरोडेखोरांनी चेहरे कापडाने झाकले होते. दरोडेखोरांनी अंगडिया कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली. कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी दरोडेखोरांनी गोळीबार केला. कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटून ते पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.