no images were found
एसटी कर्मचाऱ्यांवरील सिल्वर ओक समोर आंदोलन प्रकरणी खटले मागे
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आंदोलनकर्त्या सर्व ११८ कर्मचाऱ्यांविरोधातील खटले मागे घेण्यास गृह विभागाने परवानगी दिली आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्यावर्षी संप पुकारला होता. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा ठप्प झाली होती. या काळात १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या संपकऱ्यांनी शरद पवार यांच्या घरासमोर प्रचंड निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला होता. त्यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलकांची धरपकड केली होती. महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आंदोलनकर्त्या ११८ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम या ११८ कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द केले. आता त्यांच्यावरील खटले मागे घेत त्यांना दिलासा दिला आहे.