no images were found
लोकसभेच्या येत्या निवडणुकीत विरोधकाना उमेदवार शोधावे लागतील
कोल्हापूर : 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारांची शोधाशोध करावी लागेल. लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष प्रवेशाचे मोठे स्फोट होतील. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिंदे गट हे ४५ पेक्षा जास्त जागा जिंकतील या पद्धतीने निवडणुकीचे नियोजन सुरू आहे. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकावर टीका केली.
बावनकुळे हे शनिवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी हे वक्तव्य केले. ते पत्रकाराशी बोलत होते. राज्यातील विकास प्रकल्प आणि राज्यात स्थलांतरित होत आहेत त्याला शिंदे व फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कारणीभूत नाही तर महाविकास आघाडीचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. ज्या राज्याचा मुख्यमंत्री 18 महिने मंत्रालयात फिरकले नाहीत, त्या राज्यात गुंतवणूकदार हजारो कोटीची गुंतवणूक कशी करतील अशा शब्दात बावनकुळे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पत्र प्रकल्प आणि राज्यात जात आहेत त्याचे पाप ठाकरे आणि पवार सरकारचे आहे. मुदतीमध्ये त्रुटींची पूर्तता न केल्यामुळे ऊर्जा प्रकल्प बाहेर गेला त्यावेळी राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार होते हे बावनकुळे आणि निदर्शनास आणले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असताना काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपमध्ये दाखल होत आहेत. काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रालय हजर केले होते मंत्रालयातील सातही मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा कब्जा होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचाराशी केलेली फारकत ही त्यांची सगळ्यात मोठी चूक होती. मतांच्या लांगूनचालूनसाठी ठाकरे यांनी काँग्रेसचे सगळे विचार स्वीकारले. त्यांनी आता फक्त काँग्रेसचे संविधान स्विकारायचे एवढेच शिल्लक ठेवले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेत घेतलेल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांची ही काँग्रेसशी मिळतीजुळती भूमिका मान्य नाही. त्यामुळे खासदार आमदारांसह कार्यकर्तेही ठाकरे यांची साथ सोडत आहेत असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील जनतेसाठी २४ तास काम करणारी जोडी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासात्मक कारभार सुरू असल्याचे प्रशस्तीपत्रक बावनकुळे यांनी दिले. सातारा येथे शुक्रवारी बाराशे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले .
शिंदे फडणवीस सरकार कोसळणार या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश जयंत पाटील यांच्या विधानाचाही बावनकुळे यांनी समाचार घेतला. जयंत पाटील यांनी हिम्मत असेल तर बहुमत सिद्ध करावे. सभागृहात त्यांना आमची ताकद दिसून येईल. सभागृहात आमचे बहुमत 164 होते ते १८४ पर्यंत जाईल. दोन्ही काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर राहतील असा इशाराही त्यांनी जयंत पाटील यांना दिला.
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत ठाकरे गट आणि दोन्ही काँग्रेसला उमेदवार शोधाशोध करावी लागेल, अशी स्थिती निर्माण करू असा गर्भित इशारा बावनकुळे यांनी दिला. पत्रकार परिषदेला भाजपचे मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, राहुल चिकोडे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, संजय एस. पाटील, सत्यजित कदम, महेश जाधव,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक माने, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर, महेश चौगुले, जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील,आदी उपस्थित होते.