शिवाजी विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागातर्फे ‘वास्तवातील समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी):शिवाजी विद्यापीठातील सांख्यिकी विभागाच्या वतीने १० फेब्रुवारी २०२६ रोजी ‘स्टॅटिस्टिकल एक्सप्लोरेशन ऑफ रिअल प्रॉब्लेम्स’ (Statistical Exploration of Real Problems) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू सिनेट हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात सांख्यिकी या विषयाचा दैनंदिन जीवनातील आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी होणारा वापर यावर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने आणि दीपप्रज्वलनाने झाली. सांख्यिकी विभागप्रमुख प्रा. शशिभूषण बी. महाडिक यांनी प्रास्ताविक केले तसेच मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी निवृत्त प्राध्यापक प्रा. अनिल गोरे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘सॉफ्ट स्किल्स’ (Soft Skills), संभाषण कौशल्य आणि गुगल व एआय (AI) चा प्रभावी वापर करण्यावर भर दिला. “केवळ पुस्तकी ज्ञान न मिळवता समाजाच्या प्रश्नांवर काम केल्यास व्यक्तिमत्व विकास होतो आणि नोकरीच्या संधीही वाढतात,” असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी सांख्यिकी विषयाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, सांख्यिकी हा विषय ‘मिठासारखा’ आहे; जसे मिठाशिवाय जेवण पूर्ण होत नाही, तसे सांख्यिकीशिवाय कोणत्याही विषयाची खोली समाजापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी कोल्हापुरी गुळाच्या संशोधनाचे उदाहरण दिले, जिथे ११४ गावांमधील माती, पाणी आणि पर्यावरणाच्या सांख्यिकीय डेटाचा अभ्यास करून कोल्हापुरी गुळाचे वैशिष्ट्य जगासमोर मांडले गेले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. सुवर्णा गोडसे-पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. या कार्यशाळेला कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि मुंबई यांसारख्या विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.