
no images were found
इचलकरंजीत शनिवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
इचलकरंजी : येथील व्यंकोबा मैदानात शनिवार दि. १२ रोजी सायंकाळी ४ वाजता निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये महान भारत केसरी पै.माऊली जमदाडे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. योगेश पवार यांची प्रथम क्रमांकासाठी लक्षवेधी लढत होणार आहे. कुस्ती प्रेमींनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कुस्ती भूषण उपमहाराष्ट्र केसरी पै.अमृत भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या वेळी पै. अमृत भोसले म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा शहर व राष्ट्रीय तालिम संघाच्या मान्यतेने या कुस्त्या आयोजित केल्या आहेत. कोल्हापूर नंतर वस्त्रनगरीने कुस्ती परंपरा जपलेली आहे. व्यंकोबा मैदानात अनेक लहान-मोठे मल्ल तयार होत आहेत. त्यांच्या मल्लविद्येत भर पडावी, अनेक डावपेच त्यांना उपजत प्राप्त व्हावेत, या उद्देशाने नामवंत मल्लांच्या कुस्त्या व्यंकोबा मैदान येथे आयोजित करून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. प्रमुख सात लढतींसह ७५ ते ८० चटकदार काटालढतीच्या कुस्त्यांचा आनंद शौकिनांना पहावयास मिळणार आहे.
माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी आमदार महादेवराव महाडीक, बाळदादा गायकवाड, कुस्तीप्रेमी शामराव फडके व डॉ. विलास जोशी आदींच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी 4 वाजता मैदानाचे उद्घाटन होणार आहे. याचा लाभ कुस्तीप्रेमींनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भारत बोंगार्डे, रविंद्र लोहार, मोहन सादळे, बापू एकल, सुकुमार माळी, अनिस म्हालदार आदी उपस्थित होते.
अशा होणार लक्षवेधी लढती:
प्रथम क्रमांक : पै.माऊली जमदाडे वि. पै. योगेश पवार
द्वितीय क्रमांक : पै.भरत मदने (इंदापूर) वि.पै.बाला रफीक (पुणे)
तृतीय क्रमांक : पै.कौतुक डाफळे (पुणे) वि.पै.विष्णू खोसे (सह्याद्री संकुल)
चतुर्थ क्रमांक पै.संतोष दोरवड (शाहूपुरी) वि.पै.महेश वरुटे (मोतीबाग)
पाचवा क्रमांक : पै.प्रशांत जगताप (व्यंकोबा मैदान) वि.पै.सतपाल नागटिकळ (गंगावेस)
सहावा क्रमांक : पै.बाळू अपराध (सांगली) वि.पै.यशवंत कलिंगा (व्यंकोबा मैदान)
सातवा क्रमांक : पै.इंद्रजीत मगदूम (मोतीबाग) वि.पै.अमोल पाटील (इस्लामपूर)