Home आरोग्य चला.. जाणून घेवूयात माकडताप :सहायक संचालक (हिवताप) डॉ. संजय रणवीर

चला.. जाणून घेवूयात माकडताप :सहायक संचालक (हिवताप) डॉ. संजय रणवीर

20 second read
0
0
17

no images were found

चला.. जाणून घेवूयात माकडताप :सहायक संचालक (हिवताप) डॉ. संजय रणवीर

 कोल्हापूर, : मागच्या आठवड्यामध्ये राधानगरी तालुक्यातील ओलवण, दाजीपूर येथील जंगलामध्ये माकडताप या आजारीसाठी कारणीभूत असणाऱ्या गोचीडचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी मणीपाल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी कर्नाटक येथील टीमने सहाय्यक संचालक हिवताप कार्यालय, कोल्हापूर यांच्या मदतीने सर्वेक्षण केले. यावेळी दाजीपूर जंगल परिसरामध्ये 50-60 गोचीड मिळाले आहेत. या गोचीडमधून विषाणू आहेत किंवा नाहीत याची खातरजमा करण्यासाठी नॅशनल इंस्टीट्युट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अद्याप अहवाल येणे बाकी आहे. तथापि, या आजाराविषयी थोडे जाणून घेवूया.

     क्यासनूर फॉरेस्ट डिसीज KFD (माकडताप)- क्यासनूर फॉरेस्ट डिसीज ज्याला स्थानिक भाषेत (माकडताप) असे म्हणतात. या रोगाचा शोध सर्वप्रथम मार्च 1957 मध्ये लागला. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील क्यासनूर नावाच्या जंगलात हा आजार पहिल्यांदा दिसून आला. म्हणूनच याला हे नाव देण्यात आले.

माकडांचा मत्यू : जंगलात मोठ्या संख्येने माकडांचा मृत्यू झाल्याचे आढळल्यानंतर शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले. हा आजार फ्लेविविरिडे (Flaviviridae) कुटुंबातील विषाणूमुळे होतो. हा विषाणू प्रामुख्याने हार्ड टिक्स, विशेषतः Haemaphysalis spinigera या प्रजातीमुळे मानवामध्ये पसरतो.

सन 1957 ते 1971 या काळात हा आजार केवळ शिमोगा जिल्ह्यापुरता मर्यादित होता. 1972 मध्ये हा आजार उत्तर कन्नड जिल्ह्यात आणि 1980 च्या दशकात दक्षिण कन्नड व चिकमंगळूर जिल्ह्यांत पसरला. 2016 मध्ये हा आजार पहिल्यांदा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून आला. कर्नाटक आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त हा आजार गोवा, केरळ आणि तामिळनाडू राज्यांच्या वनक्षेत्रातही आढळला आहे.

1983-84 आणि 2002-03 या वर्षात या रोगाचा मोठा उद्रेक झाला. या आजारात तीव्र ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. 1990 पासून कर्नाटकातील बाधित भागात लसीकरण मोहीम राबवण्यात आली. यामध्ये माकडांचा मृत्यू हा मानवामध्ये रोग पसरवण्याचा एक मोठा संकेत मानला जातो.

जंगलतोड आणि मानवाचा जंगलातील वाढता हस्तक्षेप यामुळे या रोगाचा प्रसार वाढत असल्याचे तज्ञांचे मत आहे. हा आजार प्रामुख्याने संक्रमित गोचिड चावल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. जंगलात आजारी किंवा नुकत्याच मृत पावलेल्या माकडांच्या संपर्कात आल्यामुळे हा विषाणू माणसांना होतो.

हा आजार प्रामुख्याने कोरड्या हंगामात म्हणजेच नोव्हेंबर ते जून या काळात जास्त पसरतो. कारण या काळात गोचीडांच्या निफ अवस्था अधिक सक्रिय असतात. विशेष म्हणजे हा आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे थेट पसरत नाही. गाई, म्हशी किंवा शेळया यासारख्या पाळीव प्राण्यांना हा आजार होत नाही, मात्र ते गोचीडांना एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याचे काम करु शकतात.

     गोचीडीचे जीवनचक्र – गोचीडीच्या जीवनचक्राच्या अवस्था अंडी अळी, तारुण्यावस्था व प्रौढावस्था. गोचीड शेवटच्या तीन अवस्थेमध्ये आजाराचा प्रसार करते. अंड्यानंतरच्या प्रत्येक अवस्थेच्या वाढीसाठी गोचीडीला रक्ताची गरज असते. गोचीड तीन वर्षांपर्यंत आपल्या चारही अवस्था पूर्ण करु शकते. पण बहुतांशी गोचीड या रक्त न मिळाल्याने मरुनही जातात.

आजाराची लक्षणे – अधिशयन कालावधी 3 ते 8 दिवस, तीव्र थंडी वाजून ताप येणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, उलटी किंवा जुलाब इ.  KFD साठी कोणतेही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही.

रुग्णालयात दाखल करणे- गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना जवळून देखरेख आणि गुंतागुंत व्यवस्थापित करण्यासाठी सहसा रुग्णालयात दाखल केले जाते. 

हायड्रेशन आणि पोषण- शरीरातील द्रवपदार्थ आणि इलेक्टोलाइटसचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. उलट्या किंवा अतिसारासारखी लक्षणे असल्यास IV द्रवपदार्थ दिले जाऊ शकतात.

ताप आणि वेदना व्यवस्थापन – ताप आणि स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल सारखी औषधे वापरली जातात.

रक्तस्राव व्यवस्थापन – रक्तस्त्रावाची लक्षणे असल्यास रक्तस्त्राव विकार व्यवस्थापन करण्यासाठी ताजे रक्त किंवा प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन दिले जाऊ शकते.

न्यूरोलॉजिकल लक्षणे – मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे विकसित झाल्यास मेंदूतील सूज कमी करण्यासाठी किंवा झटके नियंत्रित करण्यासाठी औषधांसह सहायक उपचार प्रदान केले जातात.

दुय्यम संक्रमण प्रतिबंध – दुय्यम जीवाणूजन्य संसर्ग टाळण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्स दिली जाऊ शकतात. जरी त्यांचा KFD विषाणूवर थेट परिणाम होत नाही.

प्रतिबंधात्मक उपाययोजना – सुरक्षात्मक कपडे घाला जसे जंगलात किंवा गोचीड असलेल्या भागात जाताना पूर्ण बाह्यांचे शर्ट, लांब पँट आणि बंद शूज घाला. गोचीडींचा नायनाट करण्यासाठी आवश्यक जंतूनाशकांचा वापर करावा. साबणाने तसेच गरम पाण्याने स्वच्छ हातपाय धुवावेत. जंगलातून तसेच शेतातून काम करुन आल्यानंतर नियमित गरम पाण्याने अंघोळ करावी. जमिनीवर बसणे व झोपणे टाळावे. मृत जंगली जनावरांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी वनविभागाला कळवावे. तसेच ग्रामपंचायत, वनविभाग, पशुसंवर्धन विभाग यांच्या सामूहिक सहकार्याने प्रतिबंधात्मक उपाय योजावेत, असे आवाहन हिवताप सहायक संचालक डॉ. संजय रणवीर यांनी केले आहे.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…