no images were found
ग्रामपंचायत निवडणूक वादातून तरुणाचा खून करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप
जळगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून तरुणाची मोटारीखाली चिरडून हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापत्नेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यात अकरा साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
या खटल्याची पार्स्वभूमी असी, धरणगाव तालुक्यातील शामखेडा येथील भगवान सातपुते, त्याचा भाऊ रघुनाथ व पुतण्या महेंद्र हे १९ मे २०१३ रोजी गप्पा मारत उभे होते. यावेळी दुचाकीवरून येत असलेले योगेश सातपुते व त्याची पत्नी सपना सातपुते हे त्यांच्याजवळ थांबले. मुद्दाम त्यांच्याजवळ दुचाकी थांबवून तुम्हाला रस्त्याच्या बाजूला थांबता येत नाही काय, असे म्हणत त्यांनी मारहाण केली. यावेळी सपना सातपुते यांनी शिवीगाळ करीत पतीला आज यांना सोडू नका खल्लास करून टाका, अशी चिथावणी दिली होती. यापूर्वी दीड वर्षअगोदर या दोन्ही गटांत ग्रामपंचायत निवडणुकीतून वाद होता.
दरम्यान, भगवान सातपुते, रघुनाथ व महेंद्र हे तक्रार देण्यासाठी दुचाकीवरुन धरणगाव पोलीस ठाण्यात जात असताना योगेश व त्याची पत्नी सपना हे मोटारीने त्यांच्यामागे निघाले.
रस्त्यात त्यांनी दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील भगवान व रघुनाथ हे रस्त्याच्या कडेला फेकले गेले, तर महेंद्र रस्त्यावर पडत मोटारीत अडकला. मोटार न थांबवता महेंद्रला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याला फरफटत ओढत नेले आणि योगेश व सपना हे दाम्पत्य घटनास्थळाहून पसार झाले. जखमींना ग्रामस्थांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमी भगवान सातपुते यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एम. काळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एम. सापत्नेकर यांच्यासमोर सुरू होता. यात अकरा जणांची साक्ष नोंदविण्यात आली. यात जखमी, मृताचा मृत्युपूर्व जबाब, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीवरून योगेश सातपुते व सपना सातपुते यांना न्यायालयाने दोषी ठरविले. जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील पंढरीनाथ बी. चौधरी यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार ताराचंद जावळ, केसवॉच म्हणून विलास पाटील यांनी सहकार्य केले.