no images were found
भाईंदर येथे सापडला १०० किलोचा दुर्मिळ पाकट मासा
ठाणे : भाईंदर येथील उत्तन भाटेबंदर समुद्र किनाऱ्यावर तब्बल शंभर किलो वजनाचा पाकट मासा सापडला आहे. दोन कोळी बांधवांच्या जाळ्यात हा मासा सापडला आहे. हा मासा समुद्रात क्वचितच सापडतो. तो या किनाऱ्यावर आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भाटेबंदर किनाऱ्यावर सुनील यांची एकवीरा आई ही लहानशी बोट आहे. या बोटीच्या सहाय्याने ते समुद्र किनारी चिखलात मासेमारी करतात. नेहमी त्यांना तिथे शिवंडा मासा मिळतो. पण अचानक त्यांच्या जाळ्यात पाकड मासा लागला आहे. या माशाला बाजारात खूप मागणी आहे त्यामुळं अचानक पाकट मासा गळाला लागल्यानं दोन्ही कोळी बांधवांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सुनील यांना सापडलेल्या माशाचे वजन तब्बल १०० किलोंचे आहे. मुंबईच्या बाजारात व्यापाऱ्यांना तो विकला तर त्याची किंमत आम्हाला १५,००० हजार रुपये एवढी मिळू शकते. तसंच, या माशाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्यामुळं त्याला अधिक मागणी आहे, असं सुनील यांनी म्हटलं आहे. पाकट माशाच्या यकृतापासून आणि शरीरापासून तेल मिळवले जाते. यकृताच्या तेलात अ आणि ड जीवनसत्व असतात. तर, शरीरापासून मिळवलेल्या तेलाचा वापर वंगण, खाद्यतेल आणि साबण तयार करण्यासाठी केला जातो. त्यांच्या त्वचेपासून कमावलेले कातडे विविध प्रकारे वापरले जाते.