Home कृषि कृषि विषयक महत्वाचा लेख  5 डिसेंबर जागतिक मृदा दिन:चला माती परिक्षण करुया आपली जमीन समृध्द करुया

कृषि विषयक महत्वाचा लेख  5 डिसेंबर जागतिक मृदा दिन:चला माती परिक्षण करुया आपली जमीन समृध्द करुया

12 second read
0
0
29

no images were found

कृषि विषयक महत्वाचा लेख  5 डिसेंबर जागतिक मृदा दिन:चला माती परिक्षण करुया आपली जमीन समृध्द करुया

जागतिक माती दिन अर्थात जागतिक मृदा दिन  दरवर्षी 5 डिसेंबर रोजी  साजरा केला जातो. मातीचे संवर्धन, सुपिकता तिच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, हा या दिवासाचा उद्देश आहे. मूलभूत जगण्यासाठी अन्नाची आवश्यता आहे. ती गरज मातीतून पिकणाऱ्या अन्न धान्यामुळे पूर्ण होते. जमिनीमधील मातीचे परिक्षण करुन योग्य पध्दतीने उत्पादन घेतले तर पिकांचे उत्पादन वाढेल. शेतातील माती निरोगी असेल तर समृध्द शेती होईल. त्यासाठी मातीचे परिक्षण करुन समृध्दता वाढविण्यावर भर दिला  जात आहे. त्यामुळे तुम्ही जर शेतकरी आहात तुमच्याकडे जमीन आहे. तर तुम्ही माहिती परीक्षण केले पाहिजे, चला! आपली माती आणि तीची पत जाणून घेऊ या !

मातीचे महत्व

अन्न वस्त्र निवारा या मुलभूत गरजा माती शिवाय पुर्ण होवू शकत नाही. माती विना शेती होवूच शकत नाही त्यामुळे निरोगी माती ही समृध्द शेतीसाठी अत्यंत आवश्क आहे. मानवाने विज्ञान व तंत्रज्ञानातून कितीही प्रगती साधली, तरी एकदा नष्ट झालेली माती पुन्हा निर्माण करता येत नाही, हे वास्तव आहे. 10 सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात त्यामुळे मातीचे महत्व खूप आहे.

माती संवर्धन- काळाची गरज

आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापलेला असून ही जैवविविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी साठविण्याची आणि शुध्द करण्याची क्षमता आहे, तसेच पूर व दुष्काळ या सारख्या संकटालाही मातीमुळे मात मिळते. विविध वनस्पतींच्या लागवडीसाठी किंवा अन्न, वस्त्र (कापूस, ताग सारखे विविध धागे) इंधन आणि औषधी वनस्पतींच्या व्यवस्थेसाठी माती मूलाधार आहे. मातीतील विविध घटक कर्बचक्रात महत्वाची भूमिका बजावतात. वातावरणातील बदल सहन करणे आणि तो सौम्य करणे यासाठी माती सहाय्यभूत ठरते. जल व्यवस्थापन आणि पूर व दुष्काळ या आपत्तींना तोंड देवून परिस्थिती पूर्वपदावर आणण्यातही मातीतील विविध घटक महत्वाची भूमिका बजावतात.अन्न सुरक्षा आणि शाश्वत भवितव्य मातीवरच अवलंबून असल्याने मातीचे संरक्षण, शाश्वत संवर्धन काळाची गरज आहे.

माती संवर्धन उपाय

माती संवर्धनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी विभाग 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत मातीचे नमुने गोळा करण्याबाबत पंधरवडा मोहिम राबवित आहे. यानुसार राज्यातील 10 लाख 80 हजार शेतकऱ्यांच्या मातीचे परिक्षण करुन जमीन आरोग्य पत्रिका वितरण करण्याचे निश्चित केले आहे. तसेच जिल्हा, तालुका, गावस्तरावर शेतकऱ्यांना जमिन आरोग्य पत्रिका वितरीत करुन जमिनीच्या आरोग्य विषयषक, माती परिक्षणाचे महत्व, जमीन सुपीकता निर्देशांक व जमिन आरोग्य पत्रिका आधारित खतांच्या संतुलित वापराविषयी, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रीय खत वापराचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कृषी विभाग,जिल्हा परिषद, आत्मा यंत्रणा, कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, नोंदणीकृत खाजगी प्रयोग शाळा, कृषि विषयक संस्था इत्यादींच्या सहयोगाने जिल्ह्यांमध्ये 5 डिसेंबर रोजी मृद आरोग्याचे महत्व, सॉईल हेल्थ कार्ड, मोबाईल ॲपव्दारे मृद नमुने तपासणी केल्यावर जमीन आरोग्य पत्रिका आधारीत खतांचा संतुलित वापर याबाबत चर्चासत्रे, व्याख्याने कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे.

माती परीक्षणाचे फायदे

मातीच्या संवर्धनासाठी माती परीक्षण करुन घेवून त्यानुसार उपयोजना केल्यास त्या फायदेशीर ठरतात त्यामुळे जमिनीतील उपलब्ध घटकांचे प्रमाण समजते. त्यावर आधारीत पिकांच्या गरजेप्रमाणे आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत होते. जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. खतांचा संतुलित वापर केल्यामुळे पिकांची वाढ चांगली होवून अधिक उत्पादन मिळते. जमिनीची सुपिकता आजमावता येते. जमिनीतीत काही दोष असतील तर ते देखील समजतात आणि दोषानुसार जमीन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करण्यात येतात.

 

माती परीक्षण कसे करावे

शेतकऱ्यांनी  कागदावर लिहून तो कागद माती नमुन्याच्या पिशवीत टाकावा. 1) माती नमुना क्रमांक 2) माती नमुना घेतल्याची तारीख 3) शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, 4) मोबाईल क्रमांक,5) गाव/पोस्ट, 6) तालुका, 7) जिल्हा, 8) सव्हे /गट क्रमांक, 9) नमुन्याचे प्रातिनिधी क्षेत्र 10) जमीन प्रकार बागायत / जिरायत, 11) मागील हंगामातील पीक / जात, 12) पुढील हंगामातील पीक / जात 13) मातीची खोली सें.मी.,14) जमीनीचा उतार 15) जमीनीची काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण,आम्ल व इतर 16) पाण्याचा निचरा बरा / वाईट, 17) माती गोळा करणाऱ्याची सही घेवून मातीचे नमुने संबंधित गावातील कृषि सहायक / कृषि पर्यवेक्षक/ मंडल कृषि अधिकारी यांच्या मार्फत किंवा शेतकत्यांनी स्वत: जिल्हा मृद चाचणी प्रयोग शाळेकडे वरील प्रमाणे माहिती भरुन पाठवावा.

मातीचा नमुना केव्हा व कोठे घ्यावा ?

मातीचा नमूना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी (सेंद्रीय व रासायनिक खते देण्यापूर्वी) व खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा, उंच- सखलपणा, पिकातील फरक व बागायत / जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. प्रत्येक भागाचा वेगळा नमूना घेण्यात यावा.

खालील ठिकाणांहून मातीचे नमूने घेवू नयेत

गुरे बसण्याची  व झाडाखालची जागा, खते व कचरा टाकण्याची जागा, दलदल व घराजवळची जागा, पाण्याच्या पाटाजवळील जागा, बांधाजवळचे क्षेत्र, झाडाझुडाचे क्षेत्र याठिकाणचे माती नमूने टाळावेत.

 

जमीन सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना

जमिनीचा चोपणपणा वाढत आहे. त्यासाठी उतारास समांतर चर काढून पाण्याचा निचरा होईल अशी काळजी घ्यावी. हेक्टरी 5 ते 10 टन जिप्सम पूड व 15 ते 25 गाड्या चांगले कुजलेले खेणखत जमिनीत मिसळून घालवे. हिरवळीच्या खतासाठी ताग, धैंचा, शेवरी सारखी पिके घेऊन फुलावर येताच जमिनीत गाडावीत. भात, कापूस, गहू, शेवरी यासारखी पिके घ्यावीत. जमीनीच्या पृष्ठावर आलेले क्षार खरवडून शेताबाहेर टाकून द्यावे. जमिनीचे लहान वाफे करुन त्यात थोडा वेळ वाफा भरुन पाणी साठवून एकदम चरावाटे बाहेर काढून टाकावे, म्हणजे पाण्याबरोबर क्षार बाहेर जातील. सेंद्रीय खतांचा भरपूर प्रमाणात वापर करावा.क्षारास दाद देणारी पिके कांदा, भात, कापूस, सूर्यफुल, शेवरी सारखी पिके घ्यावीत. क्षार संवेदनशिल पिकांची लागवड करु नये,पिकांची लागण सरीच्या कुशीत करावी. क्षारास दाद देणारी पिके घ्यावीत व पिकांची नियमीत फेरपालट करावी. जास्त प्रमाणात सेंद्रीय व हिरवळीची खते वापरावीत.पिकास योग्य वेळी थोडे थोडे पाणी द्यावे.पाण्याच्या अतिवापरामुळे क्षारांचे प्रमाण वाढल्यास माती परिक्षणानुसार जिप्समची मात्रा ठरवून त्याचा वापर करावा. चांगल्या व मचुळ पाण्याचा एकत्रित वापर करावा.

       वरील पध्दतींचा अवलंब करुन आपल्या शेतीचे आणि शेतीतील मातीचे योग्य पध्दतीने परीक्षण झाले पाहिजे. शेत जमिनीत खतांचा, पाण्याचा योग्य वापर, जमिनीला आवश्यक असणाऱ्या पिक पध्दतीचा वापर करुन शेतीची सुपिकता मातीची समृध्दता टिकवून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

  -रणजित पवार ,उपसंपादक,विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In कृषि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…