no images were found
वारकरी संप्रदायातील लोकांना ‘घुसखोर’ ठरवण्याचा अधिकार विकास लवांडे आणि राष्ट्रवादीला कुणी दिला ? – हिंदु जनजागृती समिती
अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील २० ‘घुसखोर’ लोकांची सूची प्रसारित करून स्वत:च्या आणि त्यांच्या पक्षाची वैचारिक दिवाळखोरी घोषित केली आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा एक भाग असणारी वारी, जिला ८०० वर्षांपेक्षा अधिक काळ संतांचा वारसा लाभला आहे, त्यात अमूक लोक ‘घुसखोर’ आहेत, हे ठरवण्याचा अधिकार विलास लवांडे आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुणी दिला? या संदर्भात पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वारकरी संप्रदायाच्या वतीने विविध ह.भ.प. महाराज यांनी एकत्र येऊन भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदु जनजागृती समितीसह सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना वारकरी संप्रदायाच्या या भूमिकेचे समर्थन करतो. वारकरी संप्रदायावर करण्यात आलेले आरोप हे हिंदु संतांवरील, हिंदुत्वावरील, धर्मावरील आरोप आहेत, असेच आम्ही मानतो. हे आरोप करून हिंदु समाजात दुही माजवण्याचा आणि संतपरंपरेचा अवमान करण्याच्या षड्यंत्रपूर्वक केलेल्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो, तसेच ‘विकास लवांडे यांना तात्काळ अटक करा’, अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करतो, *अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी या वेळी मांडली.*
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक श्री. उदय महा, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा अध्यक्ष श्री. राजूभाऊ मंजुळेकर, पुरातन महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री. अरविंद देठे, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. उमेश महाराज, हिंदू महासभेचे अध्यक्ष श्री श्रीराम पांडे उपस्थित होते.
*‘अर्बन नक्षलवादी’, ‘अंधश्रद्धा निर्मूलनवाले’, ‘तथाकथित पुरोगामी’ या खर्या घुसखोरांवर राष्ट्रवादीचे मौन!*
वास्तविक गेल्या काही वर्षांपासून वारीमध्ये नियोजनबद्धरित्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, ‘तथाकथित पुरोगामी’ यांच्या माध्यमातून ‘अर्बन नक्षलवाद्यां’नी घुसखोरी केली आहे. ‘अल्ला देवे, अल्ला दिलावे…’ सारख्या अभंगाचा चुकीच्या पद्धतीने मोडून-तोडून दाखवून वारीला ‘सेक्युलर’ बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘संविधान दिंडी’ काढून जे वारकरी संविधानानुसारच वागतात, त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतात. कधी ईदच्या दिवशी ‘संविधानिक ईद’ किंवा ख्रिसमसच्या काळात ‘संविधानिक ख्रिसमस’ असे उपक्रम राबवतांना ही मंडळी दिसतात का? याउलट संतांच्या अभंगांचे स्वतःला हवे तसे अर्थ काढून हिंदु समाजाला दिशाभूल करणार्या मंडळींचा वारीत सुळसुळाट झाला आहे. ही खरी ‘घुसखोरी’ आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते सोयीस्करपणे मौन पाळतात.
वारी ही आमची संतपरंपरेचा, विठ्ठलाच्या भक्तीचा भाग आहे. वारी ‘सेक्युलर’ नसून ती ‘धार्मिक परंपरा’ आहे. या परंपरांवर आघात करण्यासाठी होत असलेले प्रत्येक प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत. प्रत्येक वारकरी बांधव, ह.भ.प., यांसह प्रत्येक श्रद्धाळू हिंदूने यामध्ये पुढाकार घ्यायला हवा. आपल्या धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संघटित व्हायला हवे, असे आवाहन आम्ही करतो. तसेच आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना वारकरी संप्रदायाच्या परंपरा अबाधित राखण्यासाठी, तसेच वारीतील ‘अर्बन नक्षलवाद्यां’च्या घुसखोरीला रोखण्यासाठी कटिबद्ध आहोत. आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाची जाहीर क्षमा न मागितल्यास त्यांना त्वरित अटक करावी.