no images were found
भीक मागण्यासाठी तरुणाचे डोळे फोडले, हात-पाय तोडले
कानपूर : नोकरी देण्याचा शब्द देऊन ७० हजार रुपयांना तरुणाला विकण्यात आलं. इथून त्याच्या यातनांना सुरुवात झाली. सुरेश मांझी (३०) असं तरुणाचं नाव आहे. तो रविंद्र नगरचा रहिवासी आहे. एका भिकारी गँगच्या म्होरक्यानं मांझीची खरेदी केली. भिकारी करण्यासाठी त्याने त्याचे डोळे फोडले, हात-पाय तोडले.
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एका तरुणासोबत भयंकर प्रकार घडला आहे. नोकरी देण्याचा शब्द देऊन ७० हजार रुपयांना तरुणाला विकण्यात आलं. इथून त्याच्या यातनांना सुरुवात झाली.सुरेश मांझीला नोकरीची गरज होती. त्याच्या परिस्थितीचा फायदा ओळखीतील विजय मखरियानं घेतला. विजयनं सुरेशला झकरपुटी पुलाखाली ६ महिने डांबून ठेवलं. त्यानंतर त्याला शहरापासून दूर नेलं. सुरेश घरी न परतल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला. बराच शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा सापडला नाही.
सुरेश मांझीवर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्याला असंख्य यातना देण्यात आल्या. भिकारी गँगच्या म्होरक्यानं सुरेशचे हात, पायाचे पंजे तोडले. त्याच्या डोळ्यात केमिकल टाकलं. त्यामुळे सुरेशची दृष्टी गेली. त्याच्या शरीराला चटके देण्यात आले. या त्रासामुळे सुरेशची प्रकृती बिघडली. सुरेश जीव सोडेल असं म्होरक्याला वाटलं. त्यामुळे २ महिन्यांपूर्वी त्यानं सुरेशला विजयच्या ताब्यात दिलं. मात्र सुरेशचे हाल थांबले नाहीत. विजयनं सुरेशला उपाशी ठेवलं आणि त्याला भीक मागायला बसवलं.
एका वाटसरुच्या मदतीनं सुरेश रविवारी आपल्या घरी पोहोचला. त्याची अवस्था पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. याची माहिती स्थानिक नगरसेवकाला गुरुवारी मिळाली. त्यांनी सुरेशच्या कुटुंबियांसह पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार नोंदवली. यादरम्यान पोलीस ठाण्यात गोंधळ झाला. या प्रकरणी तीन जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याचं डीसीपी प्रमोद कुमार यांनी सांगितलं. तपासासाठी पथक स्थापन करण्यात आलं असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कुमार यांनी दिले.