no images were found
कोल्हापूर जिल्ह्यात १० ऑक्टोबरला ‘ग्रीन डे’ आणि ‘अर्थ मिनिट’चे आयोजन
कोल्हापूर, : पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यात १० ऑक्टोबरला संपूर्ण दिवस ‘ग्रीन डे’ आणि ‘अर्थ मिनिट’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे जिल्हाभरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन वीज, इंधन, कागद, प्लास्टिक आणि मोबाइल यांचा कमीतकमी वापर करून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश सार्वजनिक स्तरावर पोहोचवण्याचा हेतू आहे. यामुळे आपल्या सुदृढ आरोग्यासह पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात येईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व कोल्हापुरकरांना या उपक्रमात सहभागी होऊन देशभर आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. ६ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीत जिल्हा, विभागीय आणि तालुका स्तरावरील सर्व शासकीय कार्यालयांना दूरदृश्य प्रणालीद्वारे सूचना देण्यात आल्या. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक शासकीय, निमशासकीय संस्था तसेच सहकारी संस्थांमध्ये हा अभिनव उपक्रम साजरा करावा. नागरिकांच्या सहभागासाठी कार्यक्षेत्रात जनजागृती करावी. यासाठी शासकीय संस्था आणि नागरिकांसाठी वेगवेगळ्या गुगल लिंक तयार करून सहभागींची माहिती एकत्रित करावी. तसेच, संपूर्ण दिवशी होणाऱ्या उपक्रमांची माहिती शहर आणि गावागावांत पोहोचवावी. हा उपक्रम एक दिवस साजरा करत असलो तरी यापुढे वर्षभर यातील काही चांगल्या सवयी लावून घेणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कार्तिकेयन एस. यांनी हा देशातील अभिनव उपक्रम असल्याचे नमूद करत प्रत्येकाने सहभागी होऊन एक दिवस पृथ्वीसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी साजरा करावा, असे आवाहन केले. या उपक्रमात आपतकालीन आस्थापना, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्तीं वगळता सर्वांनी सहभाग घ्यावयाचा आहे. बैठकीत जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत रेवडेकर यांनी सादरीकरणातून उपक्रमाची माहिती दिली.
‘ग्रीन डे’तील प्रमुख उपक्रम (१० ऑक्टोबर संपूर्ण दिवस)
- संपूर्ण दिवस वीज आणि इंधनाचा वापर कमीतकमी करणे.
- कामासाठी बाहेर पडताना पायी चालणे, सायकल, इलेक्ट्रिक वाहन किंवा सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे.
- लिफ्टचा वापर न करणे.
- मोबाइलचा वापर मर्यादित ठेवणे – स्क्रीन टाइम २ तासांच्या आत आणणे आणि सलग एक तास मोबाइल न वापरणे.
- कार्यालय आणि घरातील एसीचा वापर टाळणे; पंखे आणि वीज आवश्यकतेनुसारच वापरणे.
* प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळणे.
* कार्यालय ठिकाणी कागदाचा वापर कमीत कमी करणे, डिजिटल इ फाईल प्रणालीला प्रोत्साहन देणे.
* ग्रीन डे बाबत प्रतिज्ञा घेणे.
- हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी #GreenDayKolhapur हा हॅश टॅग वापरुन सामाजिक माध्यमांवर छायाचित्रांसह पोस्ट करावी.
‘अर्थ मिनिट’ उपक्रम (१० ऑक्टोबर)
- रात्री ८.०० वा. अत्यावश्यक सेवा वगळता १० मिनिटे सर्व वीज उपकरणे बंद ठेवणे.
- सकाळी सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाने पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करणे.