no images were found
‘इत्ती सी खुशी’ मालिकेतील हे चार प्रसंग प्रेक्षकांना स्पर्शून गेले
सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेने प्रेक्षकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या आहेत. केवळ मालिकेचे कथानक नाही, तर पडद्यावर जिवंत होणाऱ्या अस्सल भावना प्रेक्षकांना भिडल्या आहेत. या मालिकेच्या केंद्रस्थानी अन्विता (सुंबुल तौकीर खान) या तरुणीची कहाणी आहे, जी जीवनातील कठीण समस्यांना आपल्या धैर्याने आणि स्थिरतेच्या ताकदीने तोंड देते. या मालिकेत हृदयस्पर्शी क्षण आणि हलके-फुलके क्षण यांचा ज्या प्रकारे समतोल साधण्यात आला आहे, ते चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे. प्रत्येक भागागणिक प्रेक्षकांना ही खात्री पटते आहे की सध्या टेलिव्हिजनवर सुरू असलेल्या सर्वाधिक प्रभावी मालिकांपैकी ही एक आहे.
येथे मालिकेतील असे चार प्रसंग दिले आहेत, जे प्रेक्षकांच्या स्मरणात राहिले आहेत.
1. अन्विताचा लवचिकपणा
दिवेकर कुटुंबातील अन्विता या कर्तृत्ववान मुलीची लक्षणीय ताकद थकित वीज बिल भरण्याच्या प्रसंगी प्रकर्षाने दिसून आली. मनाचा निर्धार करून ती आगाऊ रक्कम मागण्यासाठी आपल्या कॅफेच्या मालकाकडे जाते. तिला मनोमन ही आशा आहे की, तिचे वडील सुहास, एक ना एक दिवस त्यांची जबाबदारी ओळखतील. अन्विता ज्या परिपक्वतेने आणि निर्धाराने कुटुंबाचा भार वाहात आहे ते पाहून, तिच्यातील जबाबदारीची जाणीव पाहून प्रेक्षक प्रभावित झाले आहेत.
2. प्रेमाला वचनाचा आधार
अलीकडेच समुद्रकिनारी एक हळुवार क्षण प्रेक्षकांनी अनुभवला. अन्विता आणि विराट (रजत वर्मा) यांच्यातील उत्कट संवादाचे ते दृश्य होते. विराट कधीही तिच्याशी खोटे बोलणार नाही आणि तिचा विश्वास मोडणार नाही हीच आपली साधीशी अपेक्षा अन्विता विराटकडे व्यक्त करते, यातून तिची संवेदनशीलता तसेच प्रामाणिकतेवर उभ्या राहिलेल्या नात्याकडून तिच्या मनातील वाढत्या अपेक्षा दिसून येतात. हा ऊबदार क्षण आणि त्याचबरोबर संजय (ऋषी सक्सेना)चे तिच्या जीवनातील मूक अस्तित्व पाहताना प्रेक्षक हेलावून गेला. प्रेम आणि निरागसता यांचे दर्शन घडवणारे हे दृश्य होते.
3. कुटुंबाला नेहमीच अग्रक्रम
सुहासमुळे आपल्या आयुष्यात वेदना आणि समस्या आल्या असल्या, तरी अन्विता सुहासच्या बाबतीत अजून निराश झालेली नाही. जेव्हा सुहास अचानक गायब होतो, तेव्हा ती त्याचा माग काढत जाते. बांधकामाच्या जागी चित्रित केलेल्या दृश्याने प्रेक्षकांना स्तब्ध केले. अन्विताच्या मनात अघटित घडल्याची पाल चुकचुकते. नंतरच्या एका दृश्यात अन्विता जेव्हा आपल्या निद्रिस्त पित्याशी शांतपणे मनातील बोलते, एक दिवस ते आपले कौतुक करतील अशी अपेक्षा व्यक्त करते, तेव्हा ते दृश्य प्रेक्षकांच्या मनावर सखोल छाप सोडून गेले. कितीही संघर्ष असला, तरी कुटुंब हे नेहमीच अग्रस्थानी असते ही भावना हे दृश्य जागवते.
4. कुटुंबाचा भाग झालेले मित्र
अन्विताच्या जीवनात दिया आणि संजय या दोन अशा व्यक्ती आहेत, ज्यांच्यामुळे तिच्या जीवनात प्रकाश आहे. दिया केवळ तिला कामात मदत करत नाही; ती बहिणीसारखी आहे. ती अन्विताच्या आनंदात सहभागी असते, तिचा कामाचा भार हलका करत असते आणि प्रत्येक संकटात तिच्यासोबत असते. संजय तिचा बालपणीचा मित्र आहे. शब्दांशिवाय तो तिच्या मनातील भाव ओळखतो. तिच्या दैनंदिन जीवनात आणि कठीण प्रसंगांमध्ये त्याची मूक ताकद आणि निरंतर उपस्थिती यामुळे तिच्यासाठी तो कुटुंबातील सदस्याप्रमाणे हक्काचा माणूस आहे. त्यांच्यातील निखळ प्रेम आणि निष्ठा पाहताना आपल्याला जाणवते की, कुटुंब केवळ रक्ताच्या नात्याने बनत नाही. जे तुमचा हात कधीच सोडत नाहीत, तुमचे अश्रू पुसतात आणि तुम्हाला एकटेपण जाणवू देत नाहीत, तेही तुमच्या परिवाराचाच एक भाग बनतात. या हृदयस्पर्शी नात्याने प्रेक्षकांना मोहित केले आहे. ही अशी मैत्री आहे जी कौटुंबिक मोकळेपणा दाखवते.