no images were found
पाणी पुरवठ्याची पर्यायी यंत्रणा सज्ज करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऐन गणेशोत्सवाच्या काळात शहरातील माताभगिनी घागरी घेवून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. कोट्यावधी रुपये खर्च करून काळम्मावाडी थेट पाईपलाईन १२ वर्षांनी सुरु झाली. पण, हि योजना “असून अडचण नसून खोळंबा” असा प्रकार वारंवार घडत आहे. शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा करण्याची सर्वस्वी जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची आहे. थेट पाईपलाईन झाली म्हणून इतर पाणीपुरवठा योजनांकडे झालेल्या दुर्लक्षामुळेच आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. शहराला उद्यापासून मुबलक पाणी पुरवठा झालाच पाहिजे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा तात्काळ उभी करा. नुसत्या एका योजनेच्या भरवश्यावर न बसता पुढील काळात अशी परीस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा आणि कळंबा या तिन्ही जुन्या पाणी पुरवठा योजना पर्यायी यंत्रणा म्हणून सज्ज करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
गेले काही दिवसात शहरात निर्माण झालेल्या पाणीबाणीच्या स्थितीबाबत तात्काळ आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिंगणापूर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. यावेळी शहराच्या संपूर्ण पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, गेले अनेक दिवस शहरवासीय पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. महानगरपालिकेची यंत्रणा कुठल्याच बाबतीत सक्षम नसल्याचे दिसून येत आहे. पाणी पुरवठा हि जीवनावश्यक बाब असूनही पाच – सहा दिवस नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागते, यातून महानगरपालिकेची यंत्रणा कुचकामी असल्याचे स्पष्ट होते. सद्यस्थिती कोणकोणत्या भागांचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यांना कधीपर्यंत सुरळीतपणे पाणी पुरवठा सुरु होईल. एकंदरीत शहरातील पाणी पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी किती कालावधी लागेल? त्यासाठी अजून कोणती यंत्रणा उभी करावी लागेल, निधीची आवश्यकता किती आहे, अशी विचारणा जलअभियंता हर्षजीत घाटगे यांना केली.
जलअभियंता हर्षजीत घाटगे यांनी, आज रात्री पर्यंत शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा करण्याची ग्वाही दिली. यासह काळम्मावाडी धरणाजवळ एक सबस्टेशन, दोन नवीन पंप, शिंगणापूर येथे १२० एचपी आणि नागदेववाडी येथे १२० एचपी असे एकूण चार पंप नव्याने लागणार आहेत. यासह बालिंगा येथील नूतनीकरण आदींसाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी, एक योजना सुरु झाली म्हणून प्रशासन सुस्त झाले आहे. जुन्या यंत्रणा सक्षम करण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी जबाबदार अधिकारी, कर्मचारी का नेमलेले नाहीत? एकाच योजनेवर अबलंबून राहू नका. पर्यायी तिन्ही योजना कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा त्यासाठी आवश्यक निधी प्राधान्याने उपलब्ध करून देऊ, असे सांगितले.
पाणी पुरवठ्याच्या योजनांवर, तांत्रिक अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारी नियुक्त करा : आमदार क्षीरसागर यांच्या आयुक्तांना सूचना
पाहणी दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला. यावेळी सूचना देताना आमदार क्षीरसागर यांनी पाणी पुरवठ्याच्या योजनांवर, तांत्रिक अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारी नियुक्त करा. महानगरपालिकेच्या आकृतीबंधात आवश्यक अधिकारी, कर्मचारी वाढवायचे असतील तर त्याचा प्रस्ताव सादर करा. शहरात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवता कामा नये. त्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवा, अशा सूचना दिल्या.
थेट पाईपलाईन संदर्भात सोमवारी महानगरपालिकेत आढावा बैठक, योजनेची सल्लागार कंपनी आणि कंत्राटदार कंपनीस उपस्थित ठेवण्याच्या सक्त सूचना
थेट पाईपलाईन योजनेसाठी विधानभवनाच्या पायऱ्यावर मी आमरण उपोषण केले. त्यानंतर ही योजना मंजूर झाली. सुमारे ४८५ कोटी रुपयांची ही योजना तब्बल १२ वर्षांनी सुरु झाली. त्याचे श्रेय घेण्यासाठी त्यात अभ्यंगस्नान देखील झाले. वाजत गाजत मिरवणूक काढली. पण थेट पाईपलाईनचे पाणी पिण्याचे शहरवासियांचे स्वप्न मात्र औट घटकेचे ठरले. योजनेतील त्रुटी आणि कामाच्या निकृष्ठ दर्जाने शहरवासियांना पुन्हा अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. जर ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली तर पाण्याच्या प्रश्न मिटेल असा विश्वास लोकांच्या मनात होता. पण, झाले उलटेच. योजनेचा आराखडा करताना भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार का केला गेला नाही. सल्लागार कंपनी, कंत्राटदार कंपनीने झोपा काढायचे काम केले काय? योजनेतून मुबलक अखंडित पाणीपुरवठ्याच्या अपयशास जबाबदार कोण? असा सवाल करीत काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेशी संबधित सर्व अधिकारी, विभाग आणि खासकरून कंत्राटदार कंपनी आणि सल्लागार कंपनी यांची सोमवार दि.०१ सप्टेंबर रोजी कोल्हापूर महानगरपालिकेत बैठकीचे आयोजन करावे, अशा सूचनाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांना दिल्या.