no images were found
“मला पहिल्यापासून फिटनेसचे वेड कधीच नव्हते,:रजत वर्मा,
सोनी सबवर अलीकडेच सुरू झालेली ‘इत्ती सी खुशी’ ही मालिका त्यातील हृदयस्पर्शी कथानक आणि चारचौघांसारख्या व्यक्तिरेखा यामुळे प्रेक्षकांना आवडली आहे. मुंबईच्या पार्श्वभूमीवरील या मालिकेचे कथानक अन्विता (सुंबुल तौकीर खान) या तरुणीभोवती फिरते. अन्विता आपल्या सहा भावंडांमध्ये सगळ्यात मोठी आहे आणि अचानक आपल्या कोसळत्या घराला आधार देण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आहे. अन्विताचा मित्र विराटची भूमिका करत आहे अभिनेता रजत वर्मा. त्याचे मोहक व्यक्तिमत्व आणि साधा स्वभाव यामुळे प्रेक्षकांचा तो लाडका झाला आहे.
एरवी आपल्या आसपास असतो असा मोहक व्यक्तिमत्वाचा तरुण म्हणून ओळखला जाणारा रजत यावेळी जरा ठसठशीत आणि पिळदार शरीराचा तरुण म्हणून स्वतःची ओळख उभी करत आहे. विराटच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्यासाठी रजतने आपले स्नायू आणि शरीर पिळदार केले आहे. एरवी फिटनेसचे वेड नसलेला आणि जिममध्ये फारसा न दिसणारा रजत या भूमिकेसाठी तयारी करताना शरीरयष्टीवर काम करत आहे. शिस्तबद्ध वर्कआउट सेशन्सपासून ते आहारावरील नियंत्रणापर्यंत सारे काही करून रजत आपल्या व्यक्तिरेखेसाठी अपेक्षित असलेले मोहक व्यक्तिमत्व प्राप्त करण्यासाठी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्यातील या बदलाविषयी रजत वर्मा म्हणतो, “मला जेव्हा पहिल्यांदा विराटच्या भूमिकेबद्दल सांगण्यात आले, तेव्हाच मला हे उमगले होते की, ही भूमिका मी आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी असणार आहे. विराटची व्यक्तिरेखा ठसठशीत आहे आणि ती तशी दाखवण्यासाठी मला माझ्या शरीरयष्टीत बदल करणे गरजेचे होते. या भूमिकेसाठी स्नायू पिळदार करणे आवश्यक असल्याचे ध्यानात आल्यावर मी व्यायाम सुरू केला, आणि खरं सांगतो माझ्या तयारीतला हा सर्वात कठीण भाग होता कारण मला मुळात फिटनेसचे वेड नाही. मला तुम्ही जिममध्ये क्वचितच बघितले असेल. पण मला हे समजून चुकले होते की विराटच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर यावेच लागणार. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. सकाळी लवकर उठायचे, कसून व्यायाम करायचा. त्यात वेट-लिफ्टिंग मी पूर्वी कधीच केले नव्हते. कधी कधी तर मला प्रश्न पडायचा की हे मला झेपेल ना? पण प्रत्येक वेळी विराटची व्यक्तिरेखा पाहिल्यानंतर मला मेहनत करण्याची प्रेरणा मिळत असे. माझी इच्छा होती की, माझ्यातील हा बदल प्रेक्षकांना देखील पडद्यावर दिसावा आणि तो अस्सल वाटावा. या भूमिकेने मला शिस्त, संयम आणि चिकाटी हे गुण शिकवले आहेत आणि भले मला व्यायाम करणे आवडत नसले, तरी मी त्याचे महत्त्व जाणले आहे. कारण त्यामुळे एक अभिनेता आणि व्यक्ती म्हणूनही मला त्याचा उपयोग होत आहे.”