no images were found
निर्माता-दिग्दर्शक शिव कुमार खुराना यांचे निधन
बॉलिवूडमधील ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शिव कुमार खुराना यांचे निधन झाले आहे.
चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शिवकुमार खुराना यांचे वृद्धापकाळाने २५ ऑक्टोबर रोजी ब्रह्माकुमारी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व त्यांचा परिवार आहे.
शिव कुमार खुराना यांनी तब्बल 35 वर्ष चित्रपटसृष्टीत काम केले. अशोक कुमार, संजीव कुमार, फिरोज खान, शेख मुखतियार, हेलन, जॉय मुखर्जी, विनोद मेहरा, जरीना वहाब, कमाल सदना ते कादर खान, सदाशिव अमरापूरकर, रझा मुराद आणि अनुपम खेर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे.
शिवकुमार यांनी बॉलिवूडमध्ये अनेक नामी चित्रपट दिग्दर्शित केले होते. यामध्ये मिट्टी और सोना, फर्स्ट लव लेटर, बदनाम, बदकार यासह बदनसीब, बेआबरू, बेगुनाह, जलसाज, सोने की जंजीर, इंतकाम की आग या चित्रपटांचा समावेश आहे. याखेरीज त्यांनी दगाबाज, हम तुम और वो या चित्रपटांची निर्मिती केली आहे. चित्रपटसृष्टीत ते एक चांगले दिग्दर्शक म्हणून प्रख्यात होते. शिवकुमार खुराना यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
विनोद खन्ना यांना चित्रपटसृष्टीत ‘नायक’ म्हणून आणणारे शिवकुमार खुराना हे पहिले चित्रपट दिग्दर्शक होते. हम तुम और वो याआधी विनोद खन्ना चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत होते. परंतु शिवकुमार खुराना यांनी विनोद खन्ना यांच्या कलागुणांची कदर करीत चित्रपटांमध्ये नायक म्हणून वाव दिला. विनोद खन्ना यांना शिव कुमार खुराना यांनी हीरो म्हणून जगासमोर आणले. मेरे अपने हा विनोद खन्ना यांची सकारात्मक भूमिका असलेला हा चित्रपट हम तुम और वोच्या आधी प्रदर्शित झालेला होता. विंदू दारा सिंह यांनाही खुराना यांनीच मनोरंजनविश्वात आणले. २८ ऑक्टोबर (आज) रोजी मुंबईतील गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा येथे ४ ते ५ दरम्यान त्यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.