no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटर व महाराष्ट्र शासन यांच्यात बीडकिन येथील शासकीय शाळेची पायाभूत सुविधा उभारणीसाठी सामंजस्य करार
- शिक्षण-केंद्रित सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक विकासासाठी असलेली बांधिलकी पुन्हा अधोरेखित
बीडकिन, महाराष्ट्र, 31 जुलै 2025 : शाश्वत सामाजिक परिणाम व समग्र समुदाय विकासासाठी असलेल्या आपल्या दीर्घकालीन बांधिलकीनुसार, टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (ZPKPS), बीडकिन येथे समग्र पायाभूत सुविधा विकासासाठी जिल्हा परिषदेबरोबर सामंजस्य करार (MoU) केला.
हा सामंजस्य करार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला आणि यावेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये श्री. दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी, छत्रपती संभाजीनगर; श्री अंकित, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद; तसेच शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते. टोयोटा किर्लोस्कर मोटर कडून श्री. सुदीप दळवी, चीफ कम्युनिकेशन ऑफिसर, वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रमुख – स्टेट अफेयर्स आणि कंपनीतील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बीडकिनमधील शाळेसाठीचा हा उपक्रम टोयोटाच्या या भागातील वाढत्या सहभागाशी सुसंगत असून, महाराष्ट्रात उभारण्यात येणाऱ्या नवीन ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्पातील गुंतवणुकीस पूरक आहे, जो औद्योगिक विकासाला चालना देणार असून रोजगारनिर्मितीला हातभार लावणार आहे.
टोयोटाच्या सीएसआर तत्त्वज्ञानातील शिक्षणाचा महत्त्वपूर्ण आधारस्तंभ
टोयोटाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) धोरणात शिक्षण हा मुख्य आधारस्तंभ आहे. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीशक्ती सक्षम करणे म्हणजे सर्वसमावेशक व शाश्वत सामाजिक प्रगतीचा पाया मजबूत करणे. भारतासारख्या लोकसंख्येच्या व आर्थिकदृष्ट्या विविधतेने भरलेल्या देशात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्याच्या समान संधी हे सामाजिक, आर्थिक व बौद्धिक प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे. हे लक्षात घेऊन, टोयोटाने आपले शैक्षणिक उपक्रम ‘स्किल इंडिया’ व ‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसी’ यांसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांशी सुसंगत केले आहेत.
लहान मुलांची काळजी, प्राथमिक साक्षरता, शाळेची पायाभूत सुविधा आणि आवश्यक शैक्षणिक साधनांची उपलब्धता यावर लक्ष केंद्रित करत, टोयोटा किर्लोस्कर मोटर भविष्यातील गरजांसाठी सक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. टोयोटाच्या ‘चाइल्ड टू कम्युनिटी’ या मॉडेलचे प्रतिबिंब या दृष्टिकोनात दिसून येते – मुलांच्या शिक्षणामध्ये गुंतवणूक केल्यास त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण समाजाचा सकारात्मक परिवर्तन घडू शकतो. टोयोटाचे हे तत्त्वज्ञान ‘समुदाय विकास’ या संकल्पनेतून साकार होते.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बीडकिन ही १०० वर्षांची जुनी संस्था असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि विविध सामाजिक पार्श्वभूमीतील मुलांना शिक्षण देते. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दृष्टीने ही शाळा परिसरातील सर्वात मोठ्या शासकीय शाळांपैकी एक आहे. सध्या येथे ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत असून, लवकरच ही संख्या सुमारे १,२०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे समावेशक आणि परिणामकारक शिक्षणासाठी शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे ही काळाची गरज आहे.
या वाढत्या शैक्षणिक गरजांचा प्रतिसाद म्हणून, या उपक्रमाद्वारे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बीडकिन शाळेला एक आधुनिक, सर्वसमावेशक व भविष्यासाठी सक्षम शिक्षणपरिसरात रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी श्री. दिलीप स्वामी म्हणाले, “या भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण देणाऱ्या बीडकिन येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची पायाभूत सुविधा उन्नत करण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरसोबतचे हे सहकार्य आम्ही स्वागतार्ह मानतो. विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा असताना, हा उपक्रम अत्यंत योग्य वेळी राबवला जात असून त्यामुळे शैक्षणिक वातावरणात मोठी सुधारणा होणार आहे. अशा सहकार्यात्मक प्रयत्नांद्वारे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बळकट करणे हे सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी अत्यावश्यक आहे. या सामूहिक उद्दिष्टासाठी टोयोटाच्या पुढाकाराच्या योगदानाचे आम्ही कौतुक करतो आणि विश्वास आहे की हा प्रकल्प बीडकिनमधील विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यापक समुदायासाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करेल.”
सामंजस्य करार स्वाक्षरी दरम्यान, श्री. सुदीप दळवी, मुख्य कम्युनिकेशन अधिकारी, वरिष्ठ उपाध्यक्ष व राज्य व्यवहार प्रमुख, टोयोटा किर्लोस्कर मोटर्स प्रा. लि. म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये आमची राष्ट्रनिर्माणाची बांधिलकी केवळ मोबिलिटी सोल्यूशन्सपुरती मर्यादित नाही. आमचा ठाम विश्वास आहे की, शिक्षण ही सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन विकासाची एक अत्यंत प्रभावी साधन आहे. सुमारे 1,200 विद्यार्थ्यांसाठी एक सक्षम आणि आधुनिक शिक्षणाचा वातावरण निर्माण करून, आम्ही भावी पिढ्यांच्या क्षमतेत गुंतवणूक करत आहोत. हा सामंजस्य करार म्हणजे सरकारच्या विविध भागधारकांबरोबर आमच्या सातत्यपूर्ण सहकार्याचे प्रतीक आहे, जे सामाजिक समृद्धीस बळकटी देणाऱ्या प्रभावी उपक्रमांद्वारे घडते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील आमचा सहभाग सुरू होत आहे. पुढेही आमचे प्रयत्न ‘क्रिएटिंग मोबिलिटी फॉर ऑल’ या मूलतत्त्वावर आधारित राहतील — जे जीवनात परिवर्तन घडवू शकतात आणि संपूर्ण समाजाचा उत्कर्ष साधू शकतात.”