Home शासकीय SIR : केवळ नोंद नव्हे, आपल्या घटनात्मक अधिकाराचा आधार

SIR : केवळ नोंद नव्हे, आपल्या घटनात्मक अधिकाराचा आधार

11 second read
0
0
6

no images were found

SIR : केवळ नोंद नव्हे, आपल्या घटनात्मक अधिकाराचा आधार

 भारत निवडणूक आयोगाच्या ‘एसआयआर’अर्थात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी स्वतःची जबाबदारी कशी पार पाडावी आणि नेमके काय करावे, याबाबतची माहिती आपण पाहू. सध्या महाराष्ट्रात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत असून, या काळात बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) प्रत्येक घराला भेट देत आहेत. या प्रक्रियेचा उद्देश प्रत्येक पात्र नागरिकाची मतदार यादीतील नोंद अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह रहावी हा आहे. ही केवळ नोंद नव्हे, आपल्या घटनात्मक अधिकाराचा आधारच आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

बीएलओ घरभेटीला येण्यापूर्वी नागरिकांनी भारत निवडणूक आयोगाच्या ईसीआय पोर्टल किंवा मोबाईल ॲप किंवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरील मागील एसआयआर मध्ये नाव शोधा या सुविधेचा वापर करून स्वतःची किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांची २००२ मधील मतदार यादीतील माहिती शोधून ठेवणे उपयुक्त ठरते. यासाठी नाव, २००२ मधील राज्य, जिल्हा आणि मतदारसंघाची माहिती भरावी लागते. जर संबंधित व्यक्ती २००२ मध्ये १८ वर्षांची नसेल, तर तिच्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या नावानेही माहिती शोधता येते. ही माहिती आधीच उपलब्ध करून ठेवल्यास बीएलओ यांना पडताळणी करताना आवश्यक माहिती त्वरित देता येते.

बीएलओ घरभेटीला आल्यानंतर नागरिकांच्या परिस्थितीनुसार प्रक्रिया पुढे जाते. जर संबंधित मतदाराचे २००२ मधील मतदार यादीशी मॅपिंग (जुळवणी) झालेले असेल, तर बीएलओ यांच्या गणना प्रपत्रावर ती माहिती आधीच उपलब्ध असते. अशावेळी नागरिकांनी त्यावरील माहिती काळजीपूर्वक तपासून ती अचूक असल्याची खात्री करावी. त्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक आणि इच्छेनुसार आधार क्रमांक नमूद करून प्रपत्रावर स्वाक्षरी करावी. अशा प्रकरणांमध्ये साधारणपणे कोणतेही अतिरिक्त कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता नसते. तथापि, आवश्यक वाटल्यास निवडणूक नोंदणी अधिकारी अतिरिक्त माहिती किंवा कागदपत्रे मागवू शकतात.

     जर २००२ मधील मतदार यादीशी मॅपिंग झालेले नसेल, परंतु संबंधित व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबाला २००२ मधील वास्तव्याची किंवा मतदार यादीतील नोंदीची माहिती माहीत असेल, तर ती माहिती बीएलओ यांना द्यावी. बीएलओ त्यांच्या अधिकृत ॲपच्या माध्यमातून ती माहिती शोधून गणना प्रपत्र पूर्ण करतात आणि त्यानंतर संबंधित मतदाराची स्वाक्षरी घेतात.

      काही नागरिकांना स्वतःच्या किंवा त्यांच्या पालकांच्या २००२ मधील मतदार यादीतील नोंदीची माहिती उपलब्ध नसू शकते. अशा परिस्थितीतही कोणताही मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहत नाही. बीएलओ संबंधित व्यक्तीला गणना प्रपत्र उपलब्ध करून देतात आणि त्यावरील आवश्यक माहिती व स्वाक्षरी घेतात. त्यानंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया सुरू राहते. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आवश्यक असल्यास संबंधित मतदाराला नोटीस देण्यात येऊ शकते. अशा वेळी भारत निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील लागू असलेले कागदपत्र भारतीय नागरिकत्व किंवा इतर आवश्यक पात्रतेचा पुरावा म्हणून सादर करावे लागू शकते.

      या संपूर्ण प्रक्रियेत बूथ लेव्हल अधिकारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पावसाळ्यात आणि विविध भौगोलिक परिस्थितीत ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचून गणना प्रपत्रांचे वितरण, माहिती संकलन आणि प्राथमिक पडताळणीचे काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती अचूकपणे उपलब्ध करून देणे, गणना प्रपत्र काळजीपूर्वक तपासणे आणि आवश्यक त्या ठिकाणी स्वाक्षरी करून प्रक्रिया पूर्ण करणे, ही लोकशाही प्रक्रियेला दिलेली सकारात्मक साथ ठरते. नागरिकांच्या या सहभागामुळे मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह बनण्यास मदत होते आणि प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अधिक सुरक्षित राहतो.

-सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. एच.सी. वर्मा.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. ए…