no images were found
कवठेमहंकाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप विजयी
तासगाव : राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे कवठेमहंकाळ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला. दहा महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा खासदार पाटलांनी काढला.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असूनही खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे निवडणुकीत विजयी होऊन नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. यामुळे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना मोठा धक्का बसला आहे.
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून राहुल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपा खासदार व विरोधी गटाकडून सिंधुताई गावडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 पैकी चार सदस्य फुटले, राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी गैरहजेरी लावल्याने संख्याबळ सहा झाले होते, मात्र विरोधातल्या घोरपडे गटाची दोन मतं ही राष्ट्रवादीला मिळाली. तर खासदार संजयकाका पाटील गटाला आठ मते मिळाली.
राहुल जगताप आणि सिंधुताई गावडे यांना प्रत्येकी आठ मते मिळाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीवर सोडत घेतली, ज्यामध्ये सिंधुताई गावडे निवडून आल्या. त्यामुळे नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला असून राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी एकाकी झुंज देऊन दहा महिन्यांपूर्वी मिळवलेली सत्ता अखेर संपुष्टात आली.दहा महिन्यांपूर्वी कवठेमहांकाळ नगरपंचायती निवडणुकीमध्ये रोहित आर आर पाटील यांनी भाजपा, काँग्रेस, शिवसेना आघाडीच्या पॅनलचा धुव्वा उडवत 17 पैकी 10 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती.
एका बाजूला भाजपाचे खासदार, माजी मंत्री आणि काँग्रेस-शिवसेनेचे दिग्गज नेते असताना रोहित पाटील यांनी विरोधकांना धोबीपछाड दिले होते. रोहित. आर. आर. पाटील यांच्या विजयाने संपूर्ण राज्यात त्यांचं कौतुक झालं होतं. मात्र आता त्याच नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत रोहित आर.आर.पाटील अर्थात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.यापूर्वी ऑगस्ट महिन्यात झालेल्या तासगावच्या किंदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीने भाजपला धक्का दिला होता. रोहित पाटील यांच्या गटाने संजयकाका पाटील गटाचा धुव्वा उडवत ग्रामपंचायतवर एकहाती सत्ता मिळवली होती.