no images were found
‘वीर हनुमान’ या पौराणिक मालिकेने पूर्ण केले 100 एपिसोड
हनुमानाच्या जीवनातील वेधक आणि फारशा माहिती नसलेल्या कथा सादर करणाऱ्या सोनी सब वाहिनीवरील ‘वीर हनुमान’ या पौराणिक मालिकेने 100 एपिसोड पूर्ण करून एक लक्षणीय टप्पा पार केला आहे. या मालिकेत बाल हनुमानाची व्यक्तिरेखा साकारली आहे, आन तिवारी या बालकलाकाराने. त्याने हनुमानाचा पराक्रम, भक्ती आणि सद्गुण पडद्यावर जिवंत केले आहेत. त्याच्या सोबत या मालिकेत आहेत, सायली साळुंखे माता अंजनीच्या तर आरव चौधरी केसरीच्या रूपात. माहिर पांधीने या मालिकेत वाली आणि सुग्रीव यांची दुहेरी भूमिका केली आहे आणि तन्मय ऋषी युवा श्रीरामाच्या भूमिकेत आहे.
100 भाग पूर्ण केल्याच्या खास प्रसंगी, या मालिकेचे कलाकार आणि क्रू सदस्य सेटवर एकत्र झाले आणि त्यांनी उत्साहाने आणि मैत्रीपूर्ण वातावरणात केक कापून आनंद साजरा केला. या टीमने प्रेक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. यापुढे देखील प्रेक्षकांची साथ आणि त्यांचे प्रेम या मालिकेला असेच मिळत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
बाल हनुमानाची भूमिका करत असलेला आन तिवारी म्हणतो, “आमच्या मालिकेने 100 भाग पूर्ण केले, याचा मला इतका आनंद झाला आहे! हनुमानाची भूमिका करताना मला शौर्य आणि दया यांचे धडे मिळाले. आमची मालिका पाहून लोकांना आनंद मिळतो, हे पाहून मला अभिमान वाटतो.”
श्रीरामाची भूमिका करत असलेला तन्मय ऋषी शाह म्हणतो, “आम्ही 100 एपिसोड पूर्ण केले! या मालिकेत काम करायला आणि श्रीरामाविषयी अधिक जाणून घ्यायला मला खूप आवडते आहे. आमची मालिका दररोज बघणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो.”
केसरीची भूमिका करत असलेला आरव चौधरी म्हणतो, “100 एपिसोड पूर्ण करणे हे आमचे एक हृदयस्पर्शी यश आहे. हनुमानाची गोष्ट कालातीत आहे आणि अशा दिव्य मालिकेत हनुमानाच्या पित्याची, केसरीची भूमिका करत असल्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो, कारण मी स्वतः हनुमान भक्त आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि ही आमच्या टीमची निष्ठा आहे, ज्यामुळे आम्ही इथवर पोहोचलो आहोत.”