no images were found
वाढलेल्या मतदारसंख्येने काँग्रेसचे ढोंगही सपशेल फेल जाईल-रविंद्र चव्हाण
मुंबई, : राहुल गांधी आणि महाविकास आघाडीवाले वारंवार वाढलेल्या मतदारसंख्येबाबत बोलत आहेत. पण जसे भाजपाच्या विजयी मतदारसंघात मतदार संख्या वाढली, तशीच ती महाविकास आघाडीच्या विजयी मतदारसंघात सुद्धा वाढली, असे असतानाही राहुल गांधींसह विरोधक वाढलेल्या मतदानाची टूम लावून धरत आहेत. विरोधकांनी अशा कितीही वावड्या उठवल्या, तरीही यापूर्वी जसे ‘संविधान बचाव’ आणि ‘ईव्हीएम हटाव’ सारखे मविआचे ढोंगी प्रयोग दणदणीत आपटले, तसेच वाढलेल्या मतदारसंख्येचे ढोंगही सपशेल फेल जाईल कारण काँग्रेसच्या या भूलथापांना महाराष्ट्र आता भुलणार नाही, अशा शब्दात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात लाखो, करोडो मते वाढल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अन्य नेते वारंवार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
रविंद्र चव्हाण पुढे म्हणाले, “गेल्या ११ वर्षांत देशवासीयांना दहशतवाद, नक्षलवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगुलचालनापासून सुटका मिळाली आहे. देशाचा अभूतपूर्व विकास होत आहे. वन्दे भारतसारख्या आधुनिक रेल्वे धावत आहेत. मेट्रो नेटवर्क दिवसागणिक वाढतं आहे. उत्तम रस्त्यांचं जाळं उभारलं जातंय, उत्तम शैक्षणिक सुविधाही उभारल्या जात आहेत. औद्योगिक विकासातून रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळाली आहे. एकीकडे विकास चालू असतानाच दुसरीकडे वारसा आणि संस्कृती जपली जात आहे. प्रत्येक संकल्प सिद्धीस नेत भारतीय जनता पार्टीने जनतेचा अतूट विश्वास कमावला आहे. म्हणूनच जनतेने राष्ट्र आणि महाराष्ट्र सांभाळण्याची धुरा ‘नरेंद्र-देवेंद्र’ या जोडीवर सोपवली आहे. परंतु इतक्या वेळा पराभव पत्करायला लागूनही विरोधकांनी अजूनही आत्मपरिक्षण केलेले दिसतं नाही. पूर्वी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यात विरोधकांनी धन्यता मानली. मात्र कर्नाटक आणि तेलंगणासारख्या राज्यांमध्ये जेव्हा काँग्रेस आणि मविआ जिंकले, तेव्हा महाविकास आघाडीवाल्यांनी त्याचे श्रेय ईव्हीएमला दिले नाही. काँग्रेसचा हा ढोंगीपणा जनतेच्या लक्षात आला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दणका बसला. त्यानंतर राहुल गांधींसह विरोधकांनी वाढलेल्या मतदानाची टूम काढली. पण जिथे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले, अशा पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, पुण्यातील वडगाव-शेरी, मुंबईतील मालाड पश्चिम, मुंब्रा, अशा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार संख्या वाढलीच होती. मग अशा मतदारसंघांबाबत राहुल गांधी कधीच काहीही बोलताना दिसत नाहीत. कारण त्यांना लोकांची दिशाभूल करूनच स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यात स्वारस्य आहे. वाढलेल्या मतदानावरून काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाल्यांनी रान उठवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही जनतेला त्यांचे ढोंग कळून चुकलंय. म्हणूनच काँग्रेसच्या भूलथापांना महाराष्ट्र आता भूलणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही”, असा निर्धारही चव्हाण यांनी या निमित्ताने व्यक्त केला.
राहुल गांधींच्या संविधान बचावच्या फेक नॅरिटीव्हवरही आमदार रविंद्र चव्हाण यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “लोकसभा निवडणूक काळात राहुल गांधींनी संविधान बचावच्या नावाखाली फेक नॅरिटीव्ह पसरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. ते ठिकठिकाणी एकच खोटं नाणं सारखं सारखं खणखणवत राहिले. मात्र राहुल गांधी ‘मोहब्बत की दुकान’ नसून ‘नफरत की मकान’ आहेत, हे साऱ्या जगाला आता कळलं आहे. लोकसभेच्या वेळी हिंदूविरोधी शक्ती एकत्र आल्या आणि जिहादी फतव्यांमधून एकगठ्ठा मतदान झाले. धर्मांध समाजघटकांचे लांगूलचालन आणि देशद्रोह्यांना पाठीशी घालणं, या काँग्रेस वृत्तीमुळे हिंदुस्थानात जिहादी विचार फोफावू लागले आणि महाराष्ट्रातील मतदाराला ‘बटेंगे तो कटेंगे’ हे भविष्यातील संकट दिसू लागले. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा कमी झाल्या आणि भाजपा कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. अहोरात्र मेहनत करून प्रत्येक कार्यकर्त्याने आपला बूथ मजबूत केला. संघटन, कार्यकर्ते आणि समर्थकांचे विशाल नेटवर्क यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खंबीर पाठबळ भाजपाला मिळाले. त्यामुळेच मतदार राजा जागृत झाला. ‘जागो तो एक बार, हिंदू जागो तो’, हे सर्वांपर्यंत वाऱ्यासारखे पसरले. ‘एक है तो सेफ है’, हे सगळ्यांनाच कळले. याचाच परिणाम महाराष्ट्रातच नव्हे, तर हरियाणा आणि दिल्लीतही भगवी लाट उसळली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ, दक्षिणेत अण्णा मलाई, तेजस्वी सूर्या, पूर्वांचलमध्ये हेमंत बिस्वा शर्मा, केंद्रात नितीन गडकरी, आश्विनी वैष्णव, एस. जयशंकर, ज्योतिरादित्य सिंधिया, शिवराजसिंह चौहान अशी भाजपा परिवारातील समर्थ नेतृत्वाची फळी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आदरणीय अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी झटत आहे. या उलट काँग्रेस पार्टी गांधी घराण्याची गुलाम बनून राहिली आहे, तर पवार गट, उबाठा गट, तृणमूल हे इंडी आघाडीतून आलेले पक्ष म्हणजे घराणेशाहीतून आलेले ‘फॅमिली बिझनेस’ बनून राहिले आहेत. या घराणेशाहीला भारत आता पुरता वैतागला असल्याचेही रवींद्र चव्हाण म्हणाले.