no images were found
प्रशासकीय साक्षरतेसाठी जीवन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे : प्रा.डॉ.रामचंद्र पवार
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोणतेही प्रशासकीय कामकाज करताना प्रशासकीय साक्षरतेसाठी जीवन कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आजीवन विस्तार आणि कार्य विभाग संचालक प्रा.डॉ.रामचंद्र पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व आजीवन विस्तार आणि कार्य विभाग यांच्या संयुक्त
विद्यमाने हंगामी रोजंदारी कर्मचारी यांच्यासाठी ‘प्रशासकीय साक्षरता व जीवन कौशल्य’ याविषयावर मानव्य सभागृह येथे आयोजित विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे होते. प्रा.डॉ.पवार म्हणाले की,जीवन कौशल्य ही जगण्याचा मार्ग आहेत. प्रत्येक कर्मचारी यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी जीवन कौशल्य वाढविणे महत्वाचे आहे.आपणाकडे निश्चित कौशल्य असल्यास रोजगार हमखास मिळेल.परंतु नुसते कौशल्य असून चालणार नाही, तर ती चांगल्या पद्धतीने प्रशासकीय कामकाजात वापरता आली पाहिजेत. प्रत्येकांनी चांगल्या पद्धतीने संवाद कौशल्य आत्मसात केले पाहिजे.ज्यांच्याकडे अधिकची कौशल्य आहेत.त्यांना चांगल्या प्रकारे प्रशासकीय कामकाज हाताळता येईल.
डॉ.के.बी.पाटील म्हणाले की,प्रशासकीय कामकाज करताना आपली वृत्ती,आपल्याकडे असणारे कौशल्य आणि ज्ञान महत्वाचे आहे.तसेच प्रशासकीय साक्षरतेमध्ये कायदा, डिजिटल साक्षरता व संगणक साक्षरता महत्वाची आहे.प्रशासकीय धोरणात होणाऱ्या नव नवीन तांत्रिक बदलांचा स्वीकार केला पाहिजे. प्रा.डॉ.मोरे म्हणाले की,आत्मसात केलेल्या कौशल्याचा प्रशासकीय कामकाजात सातत्याने उपयोग केला पाहिजे. नवीन बदलांना सामोरे गेले पाहिजे. प्रशासकीय कामकाजाची माहिती असून चालणार नाही तर त्याचे उपयोजनातील ज्ञान असणे आवश्यक आहे.
यावेळी सहा.प्राध्यापक दत्तात्रय कमलाकर, डॉ.प्रसाद दावणे, बबन पाटोळे, दयानंद गावडे, डॉ.संजय चोपडे, सरदार आडनाईक, धनाजी करवडे, कुमार शिंदे, विकास पाटील, विशाल हिलगे, ज्योती जांभळे,विक्रम पोवार, हेमलता लोखंडे, आकांक्षा जामदार यासह दीडशेहून अधिक हंगामी रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक सहा.प्राध्यापक डॉ.नितीन रणदिवे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सहा.प्राध्यापक डॉ.प्रवीण लोंढे यांनी केले.सूत्रसंचालन सहा.प्राध्यापक डॉ.प्रकाश बेळीकट्टी यांनी केले. तर डॉ.सचिन भोसले यांनी आभार मानले.