
no images were found
भारती सिंहने शब्बीर अहलूवालियाला ‘टेलिव्हिजनचा अजय देवगण’ म्हटले
मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय जोडी भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी अलीकडेच आपल्या एलओएल पॉडकास्टमध्ये टेलिव्हिजन वरील लाडका चेहरा शब्बीर अहलूवालिया आणि आशी सिंह या दोघांना आमंत्रित केले होते. शब्बीर आणि आशी सोनी सबवरील ‘उफ्फ ये लव है मुश्किल …’ मालिकेत युग आणि कैरी या अगदी विरुद्ध स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारत आहेत. या पॉडकास्टमध्ये त्या दोघांनी शूटिंग दरम्यान पडद्यामागे घडलेल्या गमतीजमती, किस्से, त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री आणि या मालिकेच्या वेगळेपणाविषयी हितगुज केले.
मनमोकळ्या गप्पांच्या ओघात भारती सिंहने शब्बीर अहलूवालियाचे पडद्यावरील गंभीर रूप आणि पडद्यामागील शांत वर्तणूक यांचे कौतुक केले. आपल्या खास, विनोदी शैलीत ती प्रेमाने त्याला ‘टेलिव्हिजनचा अजय देवगण’ म्हणून संबोधले. शब्बीरची पडद्यावरची सहज मोहकता आणि पडद्यामागे अंतर्मुख राहण्याचा स्वभाव याची तुलना तिने आकर्षक व्यक्तिमत्त्व, दमदार पण संयत परफॉर्मन्स आणि प्रत्यक्षात एक कुटुंब वत्सल गृहस्थ असलेल्या अजय देवगणशी केली.
शब्बीरच्या व्यक्तिमत्त्वाचे भारती सिंहने तोंड भरून कौतुक केले. तो एक ज्येष्ठ अभिनेता आहे आणि बऱ्याच वर्षांपासून टेलिव्हिजनवर काम करत असल्याने तिने आशी सिंहला शब्बीरसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे हे विचारले. भारती पुढे म्हणाली की तिला शब्बीर हा टेलिव्हिजनचा अजय देवगण वाटतो, कारण तो फारसा हसत नाही. त्याची चर्या गंभीर असते आणि परफॉर्मन्स उत्कट असतो. तिने आशीला हे देखील विचारले की शब्बीरसोबत पहिले दृश्य करताना तिला भीती वाटली होती का.
या हलक्या फुलक्या क्षणांमुळे स्टुडिओत हशा पिकला. सुरुवातीला या कसलेल्या कलाकारासोबत काम करताना आपल्याला कशी भीती वाटत होती, हे आशी सिंहने सांगितले. पण शब्बीरच्या साधेपणामुळे आणि आपलेपणामुळे कामात लवकरच मोकळेपणा आला असेही ती म्हणाली.