
no images were found
गांधी मैदान परिसराची आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून पाहणी
कोल्हापूर (प्रतिनिधी):- गांधी मैदानातील नाला ओव्हर फ्लो होवून पाणी मैदानभर पसरत दुर्गंधी सुटण्याचा प्रकार दरवर्षी घडत होता. मैदानातील नाल्याचे पाणी बाहेरून वळवून घेण्याचे काम सुरु करण्यात आले असून, यास रु.५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हे काम प्रगतीपथावर असताना सद्यस्थितीत सुरु असणारा मूळ नाला पोती, बाटल्या टाकून मुद्दाम तुंबविण्याचा प्रकार काही समाजकंटकानी केला असून, तात्काळ हा नाला साफ करून गांधी मैदानाची साफसफाई करावी व मैदान पूर्ववत खेळाडूंना सरावासाठी उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या. काल संपूर्ण गांधी मैदानात नाल्याचे पाणी शिरल्याची घटना घडली. याबाबत स्थानिक नागरिक व खेळांडूनी आमदार क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली. यापार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत गांधी मैदानांची पाहणी केली.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सूचना देताना, गेल्या काही वर्षात गांधी मैदानात साचणाऱ्या सांडपाण्यामुळे मैदानाचे नुकसान होवून, खेळाडूंची गैरसोय होत आहे. गांधी मैदानात पाणी साचू नये यासाठी महापालिका प्रशासनाने दोन टप्प्यात आराखडा तयार केला आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी रु.५ कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. या निधीतून कामास सुरवात झाली आहे. परंतु, कालच्या घटनेचा विपर्यास करून शासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे पाणी तात्काळ निर्गत करण्यासाठी उपाययोजना राबवा. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खबरदारी घ्या. या घटनेस जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कारवाई करा. हे मैदान लवकरात लवकर साफसफाई, स्वच्छता करून खेळाडूंना उपलब्ध करून द्या, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.
यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहरअभियंता नेत्रदिप सरनोबत आदी महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.