
no images were found
‘’टोयोटा किर्लोस्कर मोटर’’ साजरा करणार यावर्षीचा आंतरराष्ट्रीय महिला दिन
बंगळुरू, -महिला सबलीकरणाला बळकटी देत टोयोटा किर्लोस्कर मोटर २०२५ चा आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. ऑटोमोटिव्ह उद्योगात महिलांचे सबलीकरण आणि पुरुषांप्रमाणेच महिला कर्मचाऱ्यांना देखील समान संधी देण्याची आपली वचनबद्धता त्यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. उद्योगातील लिंगआधारित कर्मचारी समतोल साधताना निर्माण होणारे अडथळे दूर करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, टोयोटा किर्लोस्कर मोटर उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रासह आघाडीच्या पदांमध्ये महिलांना प्राधान्य देणाऱ्या धोरणांना आणि सुविधांना प्राधान्य देत आहे. २०३० पर्यंत ३०% महिला प्रतिनिधित्व साध्य करण्याच्या उद्देशाने, टीकेएम संस्थेतील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि उन्नतीसाठी अनेक उपक्रम राबवत आहे.
या वर्षीचा महिला दिन ‘ऍक्सिलरेट ऍक्शन्स’ या संकल्पनेवर आधारित असणार आहे जो टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. महिलांसाठी सर्वसमावेशक कार्यस्थळ निर्माण करणे, त्यांच्या प्रतिभेला वाव देणे आणि उत्पादन क्षेत्रात त्यांना येणारे अडथळे दूर करणे हा या मागील उद्देश आहे. महिलांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी, टीकेएम आपल्या बिदाडी प्रकल्पात एक विशेष कार्यक्रम आयोजित करणार आहे, जिथे ५०० हून अधिक महिला कर्मचारी सहभागी होतील. या कार्यक्रमात प्रमुख अधिकाऱ्यांची चर्चासत्रे, पॅनेल सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम राहणार असून, उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव केला जाईल.
या प्रसंगी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे वित्त आणि प्रशासन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष जी. शंकरा म्हणाले, “टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये आम्ही लिंगआधारित कर्मचारी विविधतेला केवळ एक आकडेवारी म्हणून पाहत नाही, तर नाविन्य आणि प्रगतीसाठी असलेला आवश्यक घटक मानतो. आमची समावेशक कार्यसंस्कृती केवळ धोरणांपुरती मर्यादित नसून, जिथे महिलांचा भरभराट होईल, त्यांना नेतृत्वाच्या संधी मिळतील आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळेल असे वातावरण निर्माण करणे हा आमचा उद्देश आहे. आमच्या सततच्या कौशल्यवृद्धी उपक्रमांद्वारे, आम्ही अधिकाधिक महिलांना या क्षेत्रातील भविष्याचा एक मुख्य भाग बनवण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे २०३० पर्यंत ३०% महिला प्रतिनिधित्वाचे आमचे लक्ष्य अधिक दृढ होईल. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने, आम्ही आमच्या महिला कर्मचार्यांच्या जिद्दीचा, सामर्थ्याचा आणि योगदानाचा सन्मान करतो, ज्या केवळ टोयोटाच्या यशाला नाही तर संपूर्ण ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या भविष्यात आकार देत आहेत.”
ऑटोमोटिव्ह क्षेत्रात लिंग आधारित कर्मचारी विविधतेला चालना देण्यासाठी कौशल्यविकास महत्त्वाचा आहे आणि टीकेएम महिलांना उद्योग-केंद्रित प्रशिक्षणाद्वारे सक्षम बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. टोयोटा टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावत असून, विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेशक्षमता १२०० पर्यंत वाढविण्यात आली आहे ज्यातील ५०% जागा महिलांसाठी राखीव आहेत. याचच एक ठोस पुरावा म्हणजे टीकेएमच्या महिला मॅरेथॉन टीमने २०२४ मध्ये झालेल्या ग्लोबल टोयोटा मॅरेथॉन रिले रेसमध्ये १०वे स्थान पटकावले होते. यामुळे केवळ खेळात नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात महिलांची जिद्द आणि ताकद अधोरेखित झाली. याशिवाय, ‘’टोयोटा कौशल्य -लर्न अँड अर्न” उपक्रमाने प्रशिक्षणार्थींना जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्ये दिली आहेत, ज्यामुळे त्यांचे रोजगार आणि दीर्घकालीन रोजगार संधी वाढल्या आहेत.
टीकेएमचे समावेशक धोरण हे अनुपालन, पायाभूत सुविधा आणि परिसंस्था विकास या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. अनुपालन विभागाद्वारे टीकेएममध्ये कठोर धोरणांद्वारे कार्यस्थळी सुरक्षा आणि संरक्षित वातावरण राखले जाते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, सीसीटीव्हीद्वारे सर्वत्र निगराणी, सुरक्षित वाहतूक आणि तक्रार निवारण प्रणाली यासारखी धोरणे काटेकोरपणे लागू केली आहेत. याशिवाय, महिलांना रात्रपाळीत काम करण्यास परवानगी मिळावी यासाठी कंपनीने धोरणात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे उत्पादन क्षेत्रातील महिलांसाठी अधिक रोजगार संधी निर्माण झाल्या. पायाभूत सुविधांचा विकास हा कंपनीच्या लिंग आधारित विविधता धोरणाचा मुख्य आधारस्तंभ आहे. यासाठी कंपनीने वेल्डिंग, असेंब्ली, पेंटिंगसारख्या विविध विभागांमध्ये महिला कामगारांसाठी विशेष सुविधा उभारल्या आहेत. यासोबतच, ६०० महिलांना राहता येईल अशी आधुनिक वसतीगृहे उभारण्यात आली आहेत, जेणेकरून त्या सुरक्षित आणि सक्षम वातावरणात काम करू शकतील. परिसंस्था विकासाअंतर्गत कंपनीने संस्थेतील सांस्कृतिक परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी “संवर्धन” उपक्रमांतर्गत १५०० हून अधिक कर्मचाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रम राबवले, ज्यामुळे अजाणतेपणी होणाऱ्या लैंगिक भेदभावाविषयी जाणीव निर्माण झाली.
याशिवाय, महिलांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुनर्नियुक्ती धोरण राबवण्यात आले आहे, जे महिलांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे घेतलेल्या करिअर ब्रेकनंतर पुन्हा कार्यक्षेत्रात परतण्यास मदत करते. तसेच, रिमोट वर्किंग आणि लवचिक कामकाजाचे पर्याय, तसेच विश्रांती (सॅब्बॅटिकल) धोरण देखील उपलब्ध आहे, जे महिलांना अधिक समतोल कार्य-जीवन अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. यशस्वी महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वगुण सत्रांमधून महिलांना प्रेरणा मिळत आहे. तसेच कौशल्य स्पर्धा आणि उद्योग-विचार मंचांमुळे महिलांचा महत्त्वपूर्ण भूमिकांमधील सहभाग वाढवला आहे..
टोयोटा किर्लोस्कर मोटर “सर्वांसाठी व्यापक आनंद निर्माण करण्याच्या” आपल्या उद्दिष्टाकडे पुढे जात असताना, लिंग आधारित विविधता आणि समावेशकतेसाठी असलेली कंपनीची वचनबद्धताच अधिक उज्ज्वल आणि प्रगतिशील भविष्य घडविण्यात महत्वाची ताकद ठरत आहे.