no images were found
भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, पोलीस घटनास्थळी दाखल
रत्नागिरी : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि शिवसेनेचे गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मंगळवारी रात्री अज्ञातांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या चिपळूण येथील घराबाहेरील पटांगणात उभ्या असलेल्या कारजवळ दगडांसह इतर वस्तू आढळून आल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर चिपळूण पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भास्कर जाधव हे सध्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत. आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला हल्ल्याच्या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. चिपळूण पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. या सगळ्याप्रकरणी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली. कोणाच्या आदेशानुसार सुरक्षा काढण्यात आली याचा जाब पोलीस अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. जय भवानी जय शिवाजी…अशा घोषणा देत हा मोर्चा काढण्यात आला आहे. काल मध्यरात्री आमदार भास्कर जाधव यांच्या घरा बाहेर पेट्रोल, बॅट्स, स्टंप आढळून आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
आ. भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केल्याच्या घटनेची दखल रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घेतली. चिपळूण पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांच्या घराला भेट देत घराच्या आवारात सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. भास्कर जाधव यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याचे वृत्त समोर आलेले असतानाच आता पोलिसांनी घरावर हल्ला झालेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.