no images were found
महाराष्ट्र राज्य निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा प्रारंभ, हदीन,साईराज,कश्यप व प्रकाश चा प्रतिस्पर्धाना धक्का
कोल्हापूर :- न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गडकरी हॉलमध्ये चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या व बँक ऑफ महाराष्ट्र ने पुरस्कृत केलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या निवड गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात प्रारंभ झाल्या.अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना,महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्यात होणार असून शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन बँक ऑफ महाराष्ट्र चे सहाय्यक महाव्यवस्थापक अभिनव काळे साहेब व कॉमन मॅन संघटनेचे अध्यक्ष व बुद्धिबळप्रेमी अँडव्होकेट बाबा इंदुलकर यांच्या हस्ते पटावर चाल करुन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर स्पर्धेचे मुख्य आंतरराष्ट्रीय पंच पुण्याचे नितीन शेणवी,मुख्य स्पर्धा संचालक मनीष मारुलकर,धीरज वैद्य,उत्कर्ष लोमटे,करण परीट, आरती मोदी व रोहित पोळ व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी स्पर्धेत सहभागी झालेली अग्रमानांकित अक्षय बोरगावकर(पुणे) अंजनेय पाठक(पुणे), इंद्रजीत महेंद्रकर(औरंगाबाद),अनिरुद्ध पोटवाड(मुंबई), श्रीराज भोसले (कोल्हापूर) यांच्यासह महिला राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेल्या कोल्हापूरच्या तृप्ती प्रभू व शर्वरी कबनूरकर या सर्वांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उद्घाटनानंतर मुख्य आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणवी यांनी सर्व खेळाडू व पालकांचे मीटिंग घेऊन नियम व सुचना सांगून सर्वांच्या शंकाचे निरसन केले. बरोबर साडेदहा वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ झाला. आज झालेल्या पहिल्या फेरीमध्ये दुसऱ्या पटावर पुण्याच्या द्वितीय मानांकित अंजनेय पाठक ला सांगलीच्या हदीन महातने बरोबरीत रोखताना विजयाच्या चांगल्या संध्या गमावल्या.वारणानगरच्या साईराज पाटील ने कोल्हापूरचे ज्येष्ठ बुद्धिबळपटू बी.एस. नाईक ना बरोबरीत रोखले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर सांगलीच्या कश्यप खाखरीया ने नागपूरच्या मानांकित साई शर्मा ला पराभवाचा धक्का दिला.पुसदच्या आकाश पुंडेने कोल्हापूरच्या मानांकित शर्विल पाटीलला बरोबरीत रोखले.