
no images were found
अहो आश्चर्य! युट्यूबवर बघून अल्पवयीन मुलीकडून स्वतःचीच प्रसूती
पुणे : पुण्यातील एका अल्पवयीन मुलीने युट्यूबवर पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती केली. याच मुलीने हे बाळ खिडकीबाहेर फेकून दिले. ही मुलगी दुसऱ्या मजल्यावर राहात असल्याने तेवढ्या उंचावरून हे बाळ पडल्याने आवाज झाला आणि या प्रकाराचा गवगवा झाला.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी माध्यमांना ही धक्कादायक माहिती दिली. चाकणकर यांनी याबाबत ट्विट केलंय. तसंच व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब किती भयंकर आणि सर्वांनीच गंभीर दखल घेण्यासारखी आहे, हे स्पष्ट केलंय. पुण्यातील उत्तम नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंडवे धावडे येथील ही घटना आहे. विशेष म्हणजे मुलगी एका खोलीत हा सगळा प्रकार करत असताना तिच्या आईला याची कल्पना होती. किंबहुना मागील ९ महिन्यांपासून आईलाही कल्पना होती. तिनं देखील मुलीच्या अशा कृतीला पाठबळ दिलं, हे धक्कादायक आहे. प्रसूतीची वेळ येताच युट्यूबवर पाहून स्वतःच स्वतःची प्रसूती करणारी ही मुलगी १७ वर्षांची आहे.
या प्रकरणी तिच्या आईला आणि ज्या डॉक्टरांकडे तिची तपासणी झाली, त्यांनाही आरोपी धरले जाईल. तसेच ज्या मुलामुळे ती मुलगी गरोदर राहिली, त्याचाही शोध सुरु असल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं. या प्रकरणात डॉक्टरांनी महिला आयोगाला किंवा महिला व बालकल्याण विभागाला यासंदर्भात माहिती देणं आवश्यक होतं, अशी भूमिका त्यांनी मांडली. सदर घटना दोन दिवसांपूर्वी घडली. कॉलनीतील कार्यकर्त्यांनी ही माहिती तत्काळ महिला व बालकल्याण विभागाला कळवली. त्यानंतर सध्या बाळावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.