
no images were found
महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे, कोल्हापूरच्या पोलीसाला अटक
सातारा : सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेड काढल्याच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मगदूम असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
जिल्ह्यात सोमवारी एक खळबळजनक घटना घडली. सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश मगदूम या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. याबाबत या युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडिलांना आणि तिच्या मित्र मैत्रिणींना दिली. कराड एसटी स्टॅण्डवर बस पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांना सोबत घेऊनच तिथे हजर झाले आणि छेड काढणाऱ्या पोलिसाला ताब्यात घेतले.
हा पोलिस कर्मचारी कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहे. कोल्हापूर पोलीस खात्यात तो खेळाडू आहे. सातारा शहरात सुरु असलेल्या पोलिसांच्या स्पर्धेसाठी तो आला होता. या घटनेतील महाविद्यालयीन युवतीने कराड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संशयित महेश मगदूम याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने हा गुन्हा बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून आणि ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी महेश मगदूम यालाही बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.