
no images were found
किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे पदवीदान सोहळ्याचे आयोजन
पुणे : येथील बाणेर येथे किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात यंदाच्या वर्षी व्यवस्थापन अभ्यासक्रमात पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला. या सोहळ्याला अनेक नामांकित व्यक्तींनी पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. विद्यार्थ्यांना गुरुवर्य आणि कुटुंबीयांच्यासमक्ष पदवी बहाल करण्यात आली. या सोहळ्याला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावल्याने हा क्षण प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला. पदवीदान सोहळा यशस्वीरित्या पार पडल्याने संस्थेने सर्वांचे आभार मानले.पदवीदान सोहळ्याला पिनकॉल इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, ईका मोबिलिटीचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुधीर मेहता यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यांच्यासोबत किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि संस्थेच्या गव्हर्निग कौन्सिलचे अध्यक्ष श्री. अतुल सी. किर्लोस्कर, गर्वर्निंग काऊन्सिलच्या उपाध्यक्षा सौ. अदिती किर्लोस्कर आणि किर्लोस्कर व्यवस्थापन संस्थेच्या पुणे येथील संचालिका डॉ. टी.जी. विजया आदी मान्यवरही उपस्थित होते.
श्री. अतुल सी. किर्लोस्कर यांनी देशातील व्यवसाय उद्योग क्षेत्राविषयी आपले विचार मांडले. स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक स्टार्टअपबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. प्रत्येक संस्थेत आता शाश्वत उपाययोजनांवर भर दिला जात असल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्ल बोलताना त्यांनी किर्लोस्कर संस्थेतील बदलत्या धोरणांचीही प्रशंसा केली. किर्लोस्कर इन्स्टिट्यूटमधून पदवी बहाल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले. मुलांच्या शिक्षणात पालकांचेही अमूल्य योगदान असते या शब्दांत त्यांनी पदवीदान सोहळ्याला उपस्थित सर्व पालकांचे मुलांना करिअरमध्ये योग्य दिशेने घडवण्यासाठी आभार मानले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या डॉ. सुधीर मेहता यांनी आपला जीवनप्रवास सर्वांसमोर मांडला. मेहता यांनी इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून करिअरला सुरुवात केली. या क्षेत्रात जम बसल्यानंतर हळूहळू त्यांनी ऑटोमोबाईल, कृषी, सेवा आणि क्रीडा क्षेत्रात सात कंपन्या सुरु केल्या. या काळात मी वेगवेगळ्या अनुभवांतून घडलो, शिकलो. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेतानाही येणा-या अनुभवात मिळालेले शिक्षण फार महत्त्वाचे असते, असे ते यावेळी म्हणाले. वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायत करताना येणा-या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी इलेक्ट्रिक वाहननिर्मितीचा अनुभव सांगितला. यश हे सरळ रस्त्याच्यावाटेतून मिळत नाही. त्यासाठी चढ-उतारांचा सामना करावा लागतो. हा प्रवास नेहमीच खाचखळग्यांनी भरलेला असतो, असे सांगत सर्वांना कठोर मेहनतीला पर्याय नसल्याचा सल्ला दिला.
याप्रसंगी डॉ.टी.जी. विजया यांनी संस्थेचा शैक्षणिक अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचा तसेच यावर्षीपासून सुरु करण्यात आलेल्या सोशल इमर्शन प्रोग्राम, कॅम्पस सुधारणा उपक्रम तसेच संस्थेला मिळालेल्या पुरस्कारांविषयीही त्यांनी माहिती दिली.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणा-या विद्यार्थ्यांना सुवर्ण तसेच रौप्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. वित्त, विपणन, मानव संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशन्स आणि व्यवसाय विश्लेषण या शाखांमध्ये अव्वल स्थान मिळवलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता क्रमांकात अव्वल क्रमांक मिळवल्याने कोमल मुलचंदानी यांना सुवर्णपदकाने गौरविण्यात आले.