
no images were found
निखिल आर्य ‘तेनाली रामा’ मालिकेत दिसणार
सोनी सबवरील ‘तेनाली रामा’ ही मालिका त्यातील चातुर्याच्या, सुजाणतेच्या गोष्टींमुळे आणि अनपेक्षित कलाटण्यांमुळे प्रेक्षकांना आवडत आहे. कहाणी पुढे सरकत आहे आणि अधिक खोलात देखील जात आहे अशा वेळी हमखास एखाद्या नव्या पात्राची कथेत एंट्री होते. नव्याने दाखल होत असलेली व्यक्तिरेखा काहीशी अबोल आहे, आसपास काय चालले आहे, याचे निरीक्षण करणारी आहे आणि आपला आवाज न चढवता सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी आहे.
कोतवालाच्या या वेधक भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता निखिल आर्य दाखल होत आहे. हा कोतवाल शांत राहून राज्याचे संरक्षण करणारा, कायद्याचे काटेकोर पालन करणारा आहे. त्याच्या अविचल व्यक्तिमत्त्वातून त्याची ताकद अनुभवास येते. तो कमी बोलतो आणि अनेक गुपिते मनात दडवून ठेवतो. कामाच्या बाबतीत तो अत्यंत गंभीर आहे आणि कामात अत्यंत नेटका आणि दक्ष आहे. प्रत्येक गुन्ह्याच्या ठिकाणी आणि कोड्यात टाकणाऱ्या घटनेत तो हजर असतो, पण शांतपणे वावरत असतो. तेनाली रामा (कृष्ण भारद्वाज) आणि लक्ष्मण (कुणाल करण कपूर) यांच्यासोबतच्या त्याच्या भागीदारीमुळे मालिकेच्या गतीशीलतेत भर पडली आहे. या त्रिकूटातील रामा नाट्यमय आहे, लक्ष्मण शांत आहे आणि कोतवाल निश्चल आहे- जणू एक खडक, ज्याच्या नजेरतून काहीच सुटत नाही. त्याच्या शांत आणि मनाचा थांग लागू न देणाऱ्या स्वभावामुळे रामा आणि लक्ष्मण या दोघांना त्याच्याबद्दल कुतूहल वाटते आणि त्याच्या रूपात एक आव्हानही दिसते. कोतवालला आधी कोण हसवू शकते अशी गंमतीदार शर्यत देखील त्यां दोघांमध्ये लागते. पण कोतवालच्या शांत मुखवट्यामागे एक खोल गुपित दडलेले आहे. कथा उलगडताना हे स्पष्ट होईल की, जे लोक कमी बोलतात त्यांच्या मनात बरेच काही लपवलेले असू शकते.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना निखिल आर्य म्हणाला, “कोतवालाची भूमिका करणे एक मस्त आव्हान आहे. ज्याच्या मौनात ताकद आहे, अशी व्यक्तिरेखा क्वचितच साकारायला मिळते. त्याच्यात काही तरी तीव्र असे आहे. तो सगळीकडे उपस्थित असतो, नेहमी सतर्क असतो पण कधीच जास्तचा शब्द बोलत नाही. त्याच्या छोट्या छोट्या हालचालींमध्येच मजा दडलेली आहे- भुवई उंचावणे, तिरपा कटाक्ष टाकणे हेच जणू त्याचे संवाद आहेत. विनोद आणि सुजाणता यांचे अफलातून मिश्रण करणाऱ्या ‘तेनाली रामा’सारख्या मालिकेत काम करायला मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. कोतवाल, रामा आणि लक्ष्मण यांच्यातील नाते पाहताना आणि विशेषतः कोतवालला हसवण्याचे त्या दोघांनी केलेले गंमतीशीर प्रयत्न पाहताना प्रेक्षकांना खरोखर मजा येईल. मी कोतवालसारखी शांत, स्थिर, दमदार आणि आपल्या मनाचा थांग लागू न देणारी व्यक्तिरेखा यापूर्वी कधीच साकारलेली नाही. मालिकेत पुढे काय घडणार आहे, याबाबत मला उत्सुकता लागून राहिली आहे.”