
no images were found
ब्रेल लिपीमधील पहिल्या शाहूचरित्र पुस्तिकेचे विद्यापीठात प्रकाशन
कोल्हापूर, (प्रतिनिधी):- दृष्टीहीन तसेच वंचित घटकांच्या ज्ञानवर्धनासाठी आधुनिक पद्धतीने प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.
राजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन प्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या वतीने आयोजित विक्रम रेपे संकल्पित ‘राजर्षी शाहू महाराज ब्रेल पुस्तिके’च्या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ब्रेल लिपीमध्ये प्रकाशित होणारे हे पहिलेच शाहूचरित्र आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
खासदार श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, विक्रम रेपे आणि त्यांच्या मित्र परिवाराने सामाजिक जाणीवेच्या भावनेतून अंध व्यक्तींपर्यंत शाहू महाराजांचे जीवनकार्य पोहोचविण्यासाठी केलेला ब्रेल पुस्तिकेचा प्रयत्न अनुकरणीय आहे. त्यांच्याप्रमाणे इतर समाजघटकांनीही वंचितांच्या सक्षमीकरणासाठी पुढे येणे अपेक्षित आहे. अंध विद्यार्थ्यांना विविध विषयांतील ज्ञान देण्यासाठी अशा अनेकानेक उपक्रमांची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी ऑडिओबुक्सही करता येऊ शकतील. आजघडीला समाजात अंधांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना दृष्टी प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेतच, त्याच बरोबरीने अंध अवस्थेचे मानवी जीवनातूनच निर्मूलन करण्यासाठी आधुनिक संशोधन करण्याचीही आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, राजर्षी शाहूंचे जीवनकार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रामार्फत भरीव कार्य झालेले आहे. विद्यापीठात दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी स्थापित केंद्रामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. दृष्टीहीन व्यक्तींपर्यंत राजर्षी शाहूंचे कार्य पोहोचविण्याच्या दृष्टीने ब्रेल पुस्तिकेचा उपक्रम अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
कोल्हापूर पुरालेखागाराचे अभिलेखाधिकारी गणेशकुमार खोडके म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक, शैक्षणिक यांसह सर्वच क्षेत्रांतील कार्य महान आहे. त्यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमांची माहिती आजही लोकांना नाही. महाराजांनी हत्तींची पैदास करण्यासाठी खास निर्माण केलेले शिवारण्य, चहा-कॉफीच्या मळ्यांचा यशस्वी प्रयोग, संस्थानात ठिकठिकाणी उभारलेली अंबाबाईची मंदिरे आदी बाबी अज्ञातच आहेत. महाराजांचा वारसा सांगत असताना आपण त्यांचे चरित्र अंगिकारणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी शाहू महाराजांच्या चरित्राचा व कार्याचा सविस्तर वेध घेतला. ते म्हणाले, शाहू महाराज हे प्रत्येक नागरिकाला एक वेगळी जीवनदृष्टी प्रदान करणारे व्यक्तीमत्त्व आहे. दीनदुबळ्यांना माणुसकीची वागणूक देणारे आणि सर्वंकष मानवी विकासाची नवी परिभाषा निर्माण करणारे शाहू महाराज होते. महाराजांच्या जीवनचरित्रामधून सातत्याने विकासाची नवी दृष्टी मिळत राहते.
अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सदैव सहानुभूतीचा दृष्टीकोन बाळगला आहे. विशेषतः दृष्टीहीन व्यक्तींसाठी रिसोर्स सेंटर फॉर व्हिज्युअली चॅलेंज्ड या केंद्रामार्फत त्यांच्यासाठी अनेकविध उपक्रम राबविले जातात. अंध विद्यार्थी हे प्रयोगपद्धतीमुळे विज्ञानाच्या शिक्षणापासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेऊन वैज्ञानिक प्रयोग कसे करावेत, यासाठीचे प्रशिक्षण शिबीरही विद्यापीठ घेते. अंध विद्यार्थ्यांना बुद्धीबळाचे प्रशिक्षण देऊन असे दहा विशेष संचही त्यांना प्रदान केले आहेत. आता लवकरच त्यांच्या स्पर्धा भरविण्याचाही मानस आहे. या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असणारे आपले विद्यापीठ राजर्षी शाहूंचे विचार व कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी प्रतिबद्ध आहे. डॉ. विलास संगवे यांच्यापासून ते डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ संशोधकांनी विद्यापीठाच्या माध्यमातून शाहूचरित्राचे अनेक पैलू समाजासमोर आणण्याची मोलाची कामगिरी केली आहे.
यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे कार्यक्रमास उपस्थित असलेल्या काही अंध विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात त्यांच्या हस्ते पुस्तिका प्रदान करण्यात आली. इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विक्रम रेपे यांनी केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, वसंतराव मुळीक, डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. नमिता खोत, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. सचिन पवार, ‘नॅब’चे एम. बी. डोंगरे, भाग्यश्री प्रकाशनाच्या भाग्यश्री कासोटे -पाटील, डॉ. प्रतिभा देसाई, उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग, विक्रम जरग यांच्यासह नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाईंड्स, मिरजकर तिकटी अंधशाळा, अंध युवक मंच या संस्थांचे संचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुस्तिकेचे राज्यातील सर्व अंधशाळांमध्ये वितरण
आज प्रकाशित करण्यात आलेल्या शाहूचरित्राच्या ब्रेल पुस्तिकेचे मुद्रक स्वागत थोरात यांच्याकडून येत्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील सर्व अंधशाळांमध्ये वितरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पुस्तिकेचा हिंदी व इंग्रजीमध्ये अनुवाद करण्याचाही मानस संकल्पक विक्रम रेपे यांनी यावेळी व्यक्त केला.