
no images were found
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते ‘जलरथा’चे उद्घाटन
कोल्हापूर, : राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ या योजनेचा गावागावात जाऊन प्रचार-प्रसार तसेच जनजागृती करण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या जलरथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. हा जलरथ प्रत्येक तालुक्यात दोन दिवस याप्रमाणे प्रत्येक गावात मागणीप्रमाणे जाणार असून या चित्ररथाव्दारे जिल्ह्यात 24 दिवस ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नाला खोलीकरण व रुंदीकरण’ याबाबत प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी स्वप्निल पवार, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) शक्ती कदम, उपविभागीय जलसंधारण अधिकारी योगेश पोळ, सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी संतोष पाटील, जिल्हा प्रकल्प समन्वयक अनिकेत कदम, भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी व जलसंधारण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील 10 स्वयंसेवी संस्था यामध्ये काम करणार आहेत. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेद्वारे शासन गावागावातील तलावांमधील गाळ काढून त्यांचे पुनरुज्जीवन करणार आहे. गाळ काढण्याचा संपूर्ण खर्च शासन करणार असून यासाठी पूर्ण राज्यात एकच दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामपंचायत किंवा पात्र स्वयंसेवी संस्थेला या कामासाठी अर्ज करुन जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पद्धतीनुसार काम करता येणार आहे. तसेच तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग शेतकरी व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून निश्चित दरानुसार अनुदानही दिले जाणार आहे.
शासनाची ही योजना गावागावात पोहोचवणे, शेतकऱ्यांना गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, जनजागृती करुन जनआंदोलन उभे करणे, मागणी अर्ज निर्माण करणे तसेच ‘गाळमुक्त धरण’ हे टेक्नॉलॉजी पोर्टल तयार करण्यासाठी भारतीय जैन संघटना (बीजेएस) आणि महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. त्या अनुषंगाने जलरथाची निर्मिती करण्यात आली असून तो जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जाऊन या योजनेचा प्रचार-प्रसार करणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी सरपंचांनी आपल्या गावांचा मागणी अर्ज ‘बीजेएस डिमांड अॅप’ वर ऑनलाईन भरायचा आहे. बीजेएसने सर्व जिल्ह्यात नेमलेले प्रशिक्षित जिल्हा समन्वयक तसेच महाराष्ट्रातील बीजेएसचे हजारो कार्यकर्ते हे बीजेएसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, ग्रामपंचायतींना, तालुका-जिल्हा प्रशासनाला सहयोग करण्यासाठी सज्ज आहेत. या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘सुहाना स्पाइसेस’ यांनी बीजेएसला सहकार्य केले आहे. योजनेची सर्व माहिती ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ म्हणजेच ‘www.shiwaar.com’ या शासनाच्या पोर्टलवर दिली आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गावांनी तलावातील गाळ काढण्यासाठी, नाला खोलीकरण-रुंदीकरणासाठी त्वरित अर्ज करून या योजनेचालाभ घ्यावा, असे आवाहन बीजेएसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.