
no images were found
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी “सहकार दरबार”
कोल्हापूर, : जिल्ह्यात १०० दिवसांच्या विशेष मोहिमेतंर्गत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराणी ताराराणी सभागृह, कोल्हापूर येथे सहकार दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांबाबत ज्यांच्या अडचणी व प्रलंबित कामे असतील त्यांनी https://tinyurl.com/Sahakar-darbar या संकेतस्थळावर दि.२६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५.०० पर्यंत आपले अर्ज दाखल करावेत. ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी सहकार विभागाच्या संबंधित तालुका अथवा जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सहकार भवन, कोल्हापूर कार्यालयात दि.२६ एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या १३ हजार पेक्षा जास्त सहकारी संस्था असून, जिल्ह्यातील सहकार चळवळीची व्याप्ती पाहता सहकार पंढरी म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात नागरी सहकारी बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था याबरोबरच औद्योगिक संस्था व साखर कारखाने, सूतगिरण्या, खरेदी विक्री संघ, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन संस्थांचे जाळे पसरलेले आहे. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत आहे. त्या संस्थांच्या माध्यमातून सभासदांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देवून सभासदांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य सहकार चळवळीतून होत आहे. सहकारी चळवळीमध्ये वाढत्या सहकारी संस्थांबरोबरच सभासदांच्या तक्रारीची संख्या व न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. सभासदांच्या तक्रारींचे निरसन वेळेत होणे तसेच तक्रारदार व संस्थांच्या समस्यांचा जलद गतीने निपटारा होणे आवश्यक आहे. सहकार दरबारमध्ये प्राप्त होणा-या अर्जाबाबत तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.