no images were found
दुकानाबाहेरचा बल्ब चोरणारा पोलिस निरीक्षक सीसीटीव्हीमुळे निलंबित कारवाई
प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यातील फुलपूर पोलीस स्टेशन परिसरात पोलिस अधिकाऱ्याने बल्ब चोरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता या प्रकरणाची दखल घेत आता आरोपी पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
फुलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तैनात इन्स्पेक्टर राजेश वर्मा यांची ड्युटी रात्रीची होती. त्या दिवशी दसऱ्याची जत्रा होती. ही घटना ६ ऑक्टोबरची आहे. प्रतापपूर बॅरिअरवर तैनात असलेला पोलिस अधिकारी एका बंद दुकानात पोहोचला आणि आजूबाजूला पाहून तेथे लावलेला बल्ब चोरून खिशात टाकून चालत राहिला. मात्र पोलिस अधिकाऱ्याची ही कृती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे त्याला माहित नव्हते.
सकाळी दुकानात बल्ब नसल्याचे दुकानदाराच्या लक्षात आल्यावर त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर हा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलीस विभागातील उच्चपदस्थांनी आरोपी कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित केले हवालदार पदावरून बढती मिळून आरोपी पोलिस निरीक्षक झाला होता. काही दिवसांपूर्वीच कानपूरमध्येही पोलिसांचे लज्जास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद झाले होते. ज्यात रात्रीच्या गस्तीदरम्यान एका पोलिसाने फुटपाथवर झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.