
no images were found
एमसीए’ विरोधात हेमंत पाटील यांचा आंदोलनाचा पवित्रा:२९ एप्रिल पासून बेमुदत उपोषणाचा इशारा
पुणे,: अनियमिततेच्या ग्रहणाने ग्रासलेल्या एमसीए अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या कारभारात सुधारणा आणण्यासाठी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यासह देशाला उत्तम दर्जाचे क्रिकेटपटू देण्याची महत्वाची जबाबदारी एमसीएवर आहे. असोशिएशनची नेतृत्व क्षमता आणि दूरदृष्टीनेच हे शक्य आहे. पंरतू, एमसीएने अद्यापही लोढा समितीच्या शिफारसीचा स्वीकार केलेल्या नाहीत. या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात आणि ज्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे, त्यांना त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे, अशी आग्रही मागणी पाटील यांनी आज, शनिवारी (ता.२९) एमसीएला सादर केलेल्या निवेदनातून केली आहे.
मागण्या मान्य केल्या नाही, तर येत्या २९ एप्रिल पासून एमसीए कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर देखील एमसीए विरोधात बेमुदत आंदोलन केले जाईल, अशी माहिती देखील पाटील यांनी दिली.एमसीएकडून गेल्या ६० वर्षांपासून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क देण्यात आलेले नाही.यासंदर्भात एमसीएने स्पष्टीकरण द्यावे, असे पाटील म्हणाले. यासोबतच असोसिएशनशी जुळलेले अनेक किक्रेट क्लब नोंदणीकृत नाहीत.एमसीए सोबत जुळलेल्या जवळपास ६० पैकी केवळ २५ क्लबच नोंदणीकृत आहेत.अनोंदणीकृत क्लबला एमसीए सोबत का जोडण्यात आले यासंदर्भात चौकशी होणे आवश्यक आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
एमसीएतील भोंगळ कारभारामुळे सरकारच्या तिजोरीलाही फटका बसतोय. पुण्यातील गव्हूंजे स्टेडियम समोरील जागा सरकारी असताना देखील या जागेचा वापर एमसीएकडून बेकायदेशीररित्या केला जात आहे. याजागेवर पार्किंग करीता वापर एमसीएकडून केला जात आहे. एमसीए मध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यासाठी विशेष उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी यानिमित्ताने केली आहे.एमसीए ने तात्काळ मागण्या मान्य कराव्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा पाटील यांनी दिला. हे आंदोलन असोसिएशनच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवण्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.