
no images were found
लक्ष्मीपूरीतील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडून दोन हजार किलो प्लास्टिक जप्त
कोल्हापूर (प्रतिनिधी):-महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज लक्ष्मीपूरी येथे हि मोहीम राबविण्यात आली. दुपारी या मोहिमेअंतर्गत सहा.आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांनी पथकांमार्फत लक्ष्मीपूरी परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी केली. यावेळी लक्ष्मीपूरी येथील पूजा ट्रेडर्स या दुकानदाराकडे 2 हजार किलो सिंगल यूज प्लॅस्टिक आढळून आले. सदरचे प्लॅस्टीक जप्त करण्यात आले असून याप्रकरणी दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सदरची कारवाई आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, सुशांत कांबळे, नंदकुमार पाटील, ऋषीकेश सरनाईक, मुकादम व कर्मचाऱ्यांनी केली.
तरी शहरातील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.