
no images were found
पन्हाळागड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल,लवकरच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही ओळखला जाईल – मुख्यमंत्री
कोल्हापूर, : महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आणि यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटर चे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा नगरपालिका मुख्याधिकारी चेतन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पन्हाळगडावर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या १३ डी शोचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण या ठिकाणी आहोत, आज छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्य हे अटकेपार उभारण्यासाठी काम केलं. या सर्व इतिहासामध्ये पन्हाळगडाचे महत्व वेगळे आहे. पन्हाळगडाचा इतिहास या १३ डी च्या माध्यमातून जगता येणार आहे. यातलं महत्त्वाचं काही असेल तर युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव मिळतो. शिवकालीन इतिहास केवळ वाचण्यापुरता नाही तर तो अक्षरशा जगण्याकरताही आहे. ज्या तज्ज्ञांनी हे काम केलं त्यांचे आभार मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी मानले. तसेच आमदार विनय कोरे यांना मी सॅल्यूट करतो या शब्दात त्यांची स्तुती केली. पन्हाळगडावर स्वराज्याच्या उपराजधानीत येऊन हा सिनेमा पाहवा असे आवाहनही त्यांनी केले.
येत्या पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता देण्याची घोषणा
आमदार विनय कोरे यांच्या पुढाकाराने जोतिबा मंदिर विकास आराखडा अतिशय सुंदर तयार झाला आहे. त्याला मान्यता दिली आहे पण त्याचं प्राधिकरण झालं पाहिजे ही मागणी आहे. यावर बोलताना
येत्या पंधरा दिवसांमध्येच प्राधिकरण स्थापन करून देतो अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नॉमिनेट केलेले आहेत. याबाबत दुसरे सादरीकरण करण्याकरता मे २०२५ मध्ये मी स्वतः पॅरिस येथे जाणार आहे. महाराजांचे किल्ले आहेत हा आपला वारसा आहेच आता तो जागतिक वारसा झाला पाहिजे. तो जगाचा वारसा झाला पाहिजे. येथील जोतिबा मंदिर आणि पन्हाळा किल्ला या दोन्ही मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत आमदार विनय कोरे यांनी शिलाहार राजवटीच्या काळातील सोन्याची मुद्रा भेट देऊन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १३ डी थिएटर आणि परिसराचे कौतुक करून सर्व विधानसभा सदस्यांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आणू असे सांगितले. आमदार विनय कोरे यांनी प्रस्ताविकामध्ये पन्हाळा किल्ल्याचा इतिहास आणि महत्त्व अधोरेखित केले. पन्हाळा पुन्हा आहे तसा उभा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी आभार मानले. कार्यक्रमात विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचा राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल ra केला. आभार माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी मानले.
पन्हाळगडचा रणसंग्राम लघुपट व १३ डी थिएटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पन्हाळगड येथे कोनशिला अनावरण व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी थिएटरच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेली शिवकालीन शस्त्रे, मुद्रा, नाणी, शिवरायांची वेशभूषा आदींची पाहणी करून माहिती जाणून घेतली. तदनंतर त्यांनी पन्हाळगडाच्या इतिहासाबाबत माहिती देणारी चित्रफीत पाहून पन्हाळगडाचा रणसंग्राम हा लघुपट पाहिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांदीची तलवारही भेट देण्यात आली.