no images were found
निराधार महिला व बालकांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहन– जिल्हाधिकारी रेखावार
कोल्हापूर : दीपावलीचा आनंद सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच महिला व बाल विकास विभागाच्या संस्थांमधील महिला व बालकांना देखील होण्यासाठी २१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये जिल्ह्यातील रोटरी क्लब, लायन्स क्लब, इनरव्हील क्लब, व्यापारी संघटना, सीएसआर मधून कार्यक्रम आयोजित करु इच्छिणाऱ्या कंपन्या, मोठे व्यावसायिक, दानशुर व्यक्तींनी अशा संस्थांना प्रमुख अतिथी म्हणून भेट द्यावी. या दरम्यान संस्थेमध्ये एक दिवसीय दीपावली सण तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन यामध्ये सहभागी होवून महिला व निराधार बालकांचा उत्साह वाढवावा व दिवाळीचा आनंद व्दिगुणित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. निराधार, पिडीत, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या, बेकायदेशीर व्यापाराला बळी पडलेल्या महिला आणि अनाथ, पोक्सो कायद्याअंतर्गत बळी पडलेली मुले, आई-वडिल दोन्ही किंवा एक पालक गमावलेली, आई-वडिल दोघेही बेपत्ता असलेली, अवैध व्यापाराला बळी पडलेली मुले, दोन्ही पालक तुरुंगात असलेल्या पालकांची मुले यांच्यासाठी आणि रस्त्यावर भिक मागणा-या मदतीची गरज असणाऱ्या अनाथ, निराधार बालकांसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. मागील दोन वर्षाच्या कालावधीत कोरोना महामारीमुळे सण साजरे करता आले नाहीत. यावर्षी संपूर्ण राज्यभरच नाही तर संपूर्ण देशभर दीपावली मोठया उत्साहात साजरी होणार आहे. जिल्ह्यामध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांकरीता 10 बालगृहे, 2 शिशुगृहे, 1 महिला आधारगृह व 1 शासकीय महिला वसतीगृह कार्यरत आहे. या संस्थांमधील महिला व निराधार बालकांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सागर नामदेव दाते 9923068135 अथवा 0231-2661788 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी कळविले आहे.